"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:17 IST2025-07-31T13:13:14+5:302025-07-31T13:17:25+5:30
Malegaon Verdict: प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
Malegaon Verdict: देशातील अतिशय चर्चेत राहिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज NIAच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी मोठा निकाल दिला. न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ आरोपींना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. मालेगावमध्ये स्फोट (Malegaon Blast) झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचे वय १०१ नाही तर ९५ वर्षे होते आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाडदेखील करण्यात आली होती. त्यामुळे सबळ पुराव्यांअभावी या सर्वांना निर्दोष मुक्त करण्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असे निकाल वाचताना NIA कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले. या निकालानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.
काही राजकीय मंडळींनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भगवा दहशतवाद असा उल्लेख करत या गुन्हेगारांना हिंदू धर्माशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर एक ट्विट केले. या ट्विटमधून त्यांनी सर्वांनाच एक स्पष्ट संदेश दिला. "भगवा दहशतवाद हा कधीच अस्तित्वात नव्हता, आता नाहीये आणि यापुढे कधी असणार नाही," असे एका वाक्यात ट्विट करत त्यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले...
"हिंदू दहशतवादाचा आणि भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह काँग्रेसप्रणित सरकारने सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्याकरता हिंदू आतंकवाद किंवा भगवा आतंकवाद असा प्रचार करण्यात आला होता, तो किती खोटा होता हे आज उघड झाले आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला, ते पाहता ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली; त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला वाईट दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे," अशी रोखठोक भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
स्फोटात ६ जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतो. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता. २९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. १७ वर्षांच्या खटल्यानंतर न्यायालयाने १९ एप्रिल रोजी सर्व सात आरोपींविरुद्ध निकाल राखून ठेवला. निकाल जाहीर करण्याची तारीख ८ मे निश्चित करण्यात आली होती. सर्व आरोपींना या दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्यानंतर न्यायालयाने निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलै ही तारीख निश्चित केली. त्यानुसार आज हा निकाल देण्यात आला.