मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 11:16 IST2025-08-03T11:16:09+5:302025-08-03T11:16:33+5:30

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाने एटीएस आणि एनआयएच्या तपासात तीव्र विसंगती असल्याचे म्हणत या ...

Malegaon 2008 Contradiction between ATS and NIA in the investigation of the bomb blast says court | मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 

मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपींची सुटका करताना विशेष न्यायालयाने एटीएस आणि एनआयएच्या तपासात तीव्र विसंगती असल्याचे म्हणत या दोन्ही तपास यंत्रणांतील संघर्षावर निकालपत्रात प्रकाश टाकला. 

आरडीएक्ससह स्फोटक  यंत्र पुण्यातील एका घरात लावण्यात आले होते, असा दावा एटीएसने केला. तर एनआयएचा निष्कर्षच अगदी वेगळा आहे. हे यंत्र इंदूरमधील एका मोटारसायकलमध्ये बसविले होते आणि सेंधवा बसस्थानकावरून मालेगावला नेण्यात आले होते. अशाप्रकारे दोन्ही तपासयंत्रणांच्या आरोपपत्रांमध्ये भौतिक तफावत आहे. दोन्ही तपासयंत्रणांचा तपास स्फोटके बसविणे, त्यांची वाहतूक करणे आणि आरोपींच्या स्फोटांतील भूमिकेबद्दल सुसंगत नाही, असे न्या. ए. के. लाहोटी यांनी सातही आरोपींची सुटका करताना म्हटले.

आरोपपत्रांमध्ये केलेल्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. आरोपपत्रांतील शब्दांकन हा निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. ‘फौजदारी खटल्यांत पुराव्यांचा संपूर्ण भार सरकारी वकिलांवर असतो आणि ते बचावपक्षाच्या कमकुवतपणावर अवलंबून राहू शकत नाही,’ अशी टिप्पणी न्यायालयाने केली. 

परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे दोषसिद्धीसाठी न्यायाधीशांनी पाच तत्त्वांची आठवण करून दिली. परिस्थिती, सुसंगत तथ्ये, निर्णायक पुरावे आणि आरोपीच्या निर्दोषतेबद्दल कोणतीही वाजवी शंका राहणार नाही, याची खात्री करून पुराव्यांची संपूर्ण साखळी सादर करणे याचा समावेश आहे, असे न्यायालयाने म्हटले. बॉम्बस्फोटसारखा गुन्हा देशाच्या सुरक्षितता आणि अखंडतेविरोधात असला तरी कायदा पुराव्याचा दर्जा कमकुवत करू शकत नाही, असेही न्यायालयाने अधोरेखित केले.

हा केवळ सरकारी वकिलांचा अंदाज
मोटारसायकल बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आल्याचा दावा तपासयंत्रणांनी केला आहे. मात्र, ती मोटारसायकल अर्धी जळाली आणि तिचा खालचा भाग खराब झाला. त्यामुळे बॉम्ब मोटारसायकलमध्ये बसविण्यात आला होता, हा सरकारी वकिलांचा केवळ अंदाज आहे, असे न्यायालयाने म्हटले. एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूरला निर्दोष ठरविले, याचीही दखल न्यायालयाने घेतली.

बॉम्बस्फोटासाठी लागणारे आरडीएक्स लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने आणल्याचा एटीएसचा दावा फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, पुरोहितने आरडीएक्स आणल्याचे, त्याचा बॉम्ब बनविल्याचे आणि तोच बॉम्ब स्फोटासाठी वापरल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. 

Web Title: Malegaon 2008 Contradiction between ATS and NIA in the investigation of the bomb blast says court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.