भिलारला प्रकाशनाचं ‘डेस्टिनेशन’ करा!

By admin | Published: May 4, 2017 11:31 PM2017-05-04T23:31:15+5:302017-05-04T23:31:15+5:30

देवेंद्र फडणवीस : ग्रंथसंपदेसाठी घर उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामस्थांनाही केला मानाचा मुजरा

Make a 'Destination' of publication! | भिलारला प्रकाशनाचं ‘डेस्टिनेशन’ करा!

भिलारला प्रकाशनाचं ‘डेस्टिनेशन’ करा!

Next


सातारा : ‘लोकांचे ज्ञान मिळविण्याची इच्छा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत पुस्तकाला मरण नाही. देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव असणाऱ्या भिलार गावातील सुज्ञ आणि साहित्यप्रेमी ग्रामस्थांनी ग्रंथसंपदेसाठी आपलं घर देऊन दातृत्व दाखविलं आहे. आता प्रकाशकांची जबाबदारी वाढली आहे. लोक लग्नासाठी जयपूरसारखं ‘डेस्टिनेशन’ निवडतात. अगदी त्याच पद्धतीने प्रकाशकांनी साहित्याच्या प्रकाशनासाठी भिलार गावाला प्राधान्य द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन गुरुवारी भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर,
आमदार मकरंद पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सभापती रूपाली राजपुरे, सरपंच वंदना भिलारे, बाळासाहेब भिलारे, विक्रम पावसकर, अतुल भोसले, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात वाचन संस्कृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यिकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, ‘मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलारवासीयांनी नवीन पाऊल टाकत असताना इतिहासदेखील रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही, एवढं कर्तृत्व या गावाने करून दाखविले आहे. साहित्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावत असते. वाचन केल्याने माणूस प्रगल्भ बनतो. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या काळात साहित्याने मोठी भूमिका बजावलेली आहे. तसेच जगात जेवढ्या राज्यक्रांती झाल्या, त्यातही साहित्याचे मोठे योगदान आहे. आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी वाचनाची सवय मात्र कमी होत नसते. ज्ञान वाचनातून मिळते, कीर्तनातूनही मिळते. त्यामुळे साहित्य संस्कृती ही संपू शकत नाही.’


विदेशात नेते मजा मारायला जात नाहीत : तावडे
‘सजग, संवेदनशील समाजाची पायाभरणी करणारा ‘भिलार पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प आहे. नेते विदेश दौरे करतात, त्यावर वारंवार टीका केली जाते. मात्र, विदेशाचा दौरा करताना डोळसपणे पाहिल्यामुळेच ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प सुचला होता. मी मागच्या सरकारकडे पुस्तकांच्या गावासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी यश आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ते शक्य झाले. त्यामुळे नेते विदेशात मजा मारायला जात नाहीत, हे सर्वांनीच लक्षात घ्यावे,’ असा चिमटा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे बघत आपल्या भाषणात काढला.


भिलार (ता. महाबळेश्वर) या ‘पुस्तकाचं गाव’ योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी डावीकडून संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री महादेव जानकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले उपस्थित होते.

Web Title: Make a 'Destination' of publication!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.