२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 07:54 IST2025-08-26T07:53:40+5:302025-08-26T07:54:10+5:30
Manoj Jarange Patil: चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
वडीगोद्री (जि. जालना) - चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. मुंबईत येणाऱ्या मुलांवर काठी उगारली, तर आपण सरकारच उलथवून टाकू, असेही ते म्हणाले.
जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. मराठा- कुणबी एकच आहेत, हा जीआर काढा, सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी आणि अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी दोन वर्षांपासून लढा सुरू आहे. परंतु, आश्वासनांपलीकडे सरकारकडून काहीच मिळालेले नाही. आम्हाला आरक्षण दिले, तर मुंबईला येणार नाही, असेही ते म्हणाले.
२७ ऑगस्ट : अंतरवाली सराटी, शहागड फाटा, साष्टपिंपळगाव, आपेगाव, पैठण, घोटण, शेवगाव, मिरी मका, पांढरीपूल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळे फाटा ते शिवनेरी किल्ला, जुन्नरला मुक्काम.
२८ ऑगस्ट : राजगुरुनगर, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे मुंबईतील आझाद मैदान.
२९ ऑगस्ट : सकाळी उपोषणाला प्रारंभ.