Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 16:20 IST2025-12-21T16:18:36+5:302025-12-21T16:20:59+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून माहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिलेले माजी आमदार राजन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला भाजप जबरदस्त धक्का दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, सिद्धी वस्त्रे या केवळ २२ वर्षांच्या असून त्या राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्या आहेत.
मोहोळमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले असून माजी आमदार राजन पाटील यांची येथे मोठी ताकद आहे. मात्र, या निकालाने त्यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान मिळाले. शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा १७० मतांच्या फरकाने पराभव केला. या निकालामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असून, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. तसेच नगरपरिषदेच्या एकूण २० जागांपैकी ९ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने मोहोळमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
विजयानंतर सिद्धी वस्त्रे यांची पहिली प्रतिक्रिया
विजयानंतर माध्यमांशी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "हा विजय म्हणजे जनतेने माझ्यावर दाखवलेला मोठा विश्वास आहे. निवडणूक काळात माझ्यावर आणि माझ्या वयावर अनेक टीका झाल्या. परंतु, आजच्या निकालाने त्या टीकेला चोख उत्तर दिले. आता केवळ शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे एकमेव ध्येय असेल."