नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 05:34 PM2024-01-29T17:34:02+5:302024-01-29T17:42:06+5:30

ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? असं रणजीत सावरकर म्हणाले.

Mahatma Gandhi not killed by Nathuram Godse's pistol bullet, claims Ranjit Savarkar | नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा

नथुराम गोडसेच्या पिस्तुलातल्या गोळीने गांधींची हत्या नाही, रणजीत सावरकरांचा दावा

मुंबई - नथुराम गोडसेच्या पिस्तुलाने झाडलेल्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झाली नाही. या तपास नीट झाला नाही त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरु कुटुंबाला झाला असा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. फॉरेन्सिक पुराव्याद्वारे आपण हे विधान करतोय. गांधी हत्येतील दडवलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणीही सावरकरांनी केली आहे. 

रणजीत सावरकर म्हणाले की, गांधींच्या जखमांची जी मापे आहेत. त्यात Entry Hole 4.2 MM आहे तर Exit Hole 6.5 MM आहे. गोडसेची पिस्तुल ही 9 MM ची होती. ही जखम मोठी असायला हवी होती. ज्यादिशेने ही गोळी आली त्यात एक गोळी बाहेरून आतमध्ये आलीय तर दुसरी गोळी आतून बाहेर आलेली आहे. वेगवेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. नथुराम गोडसेने २ फुटावरून गोळी झाडली असं म्हटलं गेले. परंतु ती जखम त्या गोळ्यांची नाही. त्या जखमेवरील दिशाही गोडसेच्या पिस्तुलीतून झाडलेल्या गोळीची नाही असा दावा त्यांनी केला. 

तसेच दोन किंवा जास्त मारेकऱ्यांनी छोट्या गोळ्यांनी ही हत्या केली. नथुराम गोडसेने ही हत्या केली नाही हे फॉरेन्सिक पुराव्यातून सिद्ध होते. गोडसे यांना हत्येच्या प्रयत्नाखाली शिक्षा झाली असती परंतु हत्येची शिक्षा नाही. ज्यांनी हत्या केली त्यांना लपवण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने प्रश्न विचारावेत. गांधींची हत्या गोडसेने केली नाही तर कुणी केली? सरकारने चौकशी करावी. जनतेला जर वाटत असेल तर सरकारने चौकशी केली पाहिजे अशी मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. रणजीत सावरकर हे सावरकरांचे पणतू आहेत. 

दरम्यान, २० ते ३० जानेवारी काळात असे ६० प्रसंग होते, ज्यावेळी नथुराम गोडसेला पोलिसांना पकडता आले असते. पण त्यांनी पकडले नाही. १० दिवस पोलिसांनी अजिबात काही केले नाही. ज्या लोकांनी खोटे पंचनामे केले त्यातील अनेकांना प्रमोशन देऊन निवृत्त करण्यात आले. गांधींच्या हत्येचा फायदा नेहरुंना झाला. दुसरा फायदा ब्रिटनला झाला. ब्रिटनची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. परंतु भारतात नेहरुंचे राज्य आल्यानंतर ब्रिटन मोस्ट फेवर्ड नेशन राहिला.  ब्रिटनचे कमी दर्जाचे तंत्रज्ञानही आपण महागात घेत राहिला. त्यामुळे ब्रिटनचे अर्थकारण पुढील २०-३० वर्ष सुरक्षित राहिले. १९७१ च्या विमानात आपल्याकडे हंटर विमाने होती. संरक्षण खात्यात भारताचे बरेच नुकसान झाले असंही रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे. 

गांधीवादी नेत्यांनी दावा फेटाळला

खोटे बोलणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित लोकांचे विशेष आहे. लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. नथुरामने गोळी झाडली. त्यावर कपूर आयोग झाला, खटला झाला, त्याने कबूल केले आणि हत्येआधी तिनदा गोडसेने गांधींना मारण्याचा प्रयत्न केला होता. महाबळेश्वरला गांधींच्या दिशेने चाकू घेऊन गोडसेच धावला होता. तेव्हा तिथल्या लोकांनी पकडले. मात्र त्याला मारू नका, माझ्याशी चर्चा करायला पाठवा असं गांधींनी म्हटलं. त्यामुळे हे खोटे सांगणे, निवडणुकीत आता हेच होणार आहे. भाजपाकडे सांगण्यासारखे काही उरले नाही म्हणून आता ते लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असेच काहीतरी बोलत राहणार असं सांगत गांधीवादी नेते कुमार सप्तर्षी यांनी रणजीत सावरकरांचा दावा फेटाळून लावला. 

Web Title: Mahatma Gandhi not killed by Nathuram Godse's pistol bullet, claims Ranjit Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.