Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 02:49 PM2019-12-18T14:49:58+5:302019-12-18T14:51:56+5:30

शिवसेना कुठेही असली आणि आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब आम्हाला आदरस्थानीच राहतील.

Maharashtra Winter Session: Devendra Fadnavis taunt Shiv Sena and Uddhav Thackeray | Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला

Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना शाब्दिक फटके मारत 'टोलंदाजी' केली.हे जनतेनं निवडलेलं सरकार नसून राजकीय स्वार्थासाठी तयार झालेलं सरकार असल्याची चपराक.बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हटलं तर इतका का त्रास होतोय?

नागपूरः भाजपा आणि शिवसेना या जुन्या मित्रांमध्ये-भावांमध्ये हल्ली रोजच 'सामना' रंगतोय. वीर सावरकरांच्या अवमानचा विषय असो किंवा नागरिकत्व कायद्याच्या पाठिंब्याचा मुद्दा असो; काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी भाजपा नेते करत आहेत, तर शिवसेनाही त्यांना जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय. टोले-टोमण्यांपर्यंत असलेली ही चकमक काल हाणामारीपर्यंतही गेली होती. भाजपा-शिवसेनेचे आमदार विधानसभेत भिडले होते. हा गोंधळ निवळल्यानंतर, आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना शाब्दिक फटके मारत 'टोलंदाजी' केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा प्रस्ताव आज शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडला आणि चर्चेला सुरुवातही केली. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीवर आणि खास करून शिवसेनेवर बाण सोडले. हे जनतेनं निवडलेलं सरकार नसून राजकीय स्वार्थासाठी तयार झालेलं सरकार असल्याची चपराक लगावतानाच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. शिवसेना कुठेही असली आणि आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब आम्हाला आदरस्थानीच राहतील. पण, सुनील प्रभू यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाआधी शरद पवारांचं नाव घेतलं. ते आपली भूमिका आणखी किती बदलणार आहेत, अशी खोचक विचारणा त्यांनी केली. बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हटलं तर इतका का त्रास होतोय, असा टोलाही त्यांनी काही सदस्यांना लगावला. कुठल्याशा हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांनी शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नावाने शपश घेतल्याचंही त्यांनी सुनावलं.

...अन् फडणवीसांनी वाचला 'सामना'!

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या बॅनरवरून काल अभिमन्यू पवार आणि संजय गायकवाड या आमदारांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर, आज देवेंद्र फडणवीस 'सामना'ची अनेक जुनी कात्रणं घेऊनच सभागृहात आले होते. शरद पवारांबद्दल 'सामना'ने काय-काय लिहिलं होतं, उद्धव ठाकरे काय-काय बोलले होते, हे त्यांनी वाचून दाखवलं. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली. तेव्हा, शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. परंतु, ही विधानं माझी नसून 'सामना'मधली आहेत आणि गेली पाच वर्षं विरोधी पक्षनेते हेच वृत्तपत्र इथे वाचून दाखवत होते, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. तुम्ही तर सामना वाचत नव्हतात, याची आठवण काही शिवसेना आमदारांनी करून देताच, मी आता 'सामना'चं सबस्क्रिप्शन लावलंय, असं ते हसत हसत म्हणाले. अखेर, शरद पवार हे सभागृहाचे सदस्य नसल्यानं, त्यांच्याबद्दलची वाचून दाखवलेली विधानं कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. 

Web Title: Maharashtra Winter Session: Devendra Fadnavis taunt Shiv Sena and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.