Ajit Pawar : "अहो गोगावले, जेवढा डिस्टर्बन्स आणाल तेवढं मंत्रिपद दूर जाईल"; अजितदादांच्या 'इशाऱ्या'ने हशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:06 IST2022-12-30T17:55:40+5:302022-12-30T18:06:22+5:30
Maharashtra Winter Session And Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते, आमदार भरत गोगावले यांची फिरकी घेतली आहे.

Ajit Pawar : "अहो गोगावले, जेवढा डिस्टर्बन्स आणाल तेवढं मंत्रिपद दूर जाईल"; अजितदादांच्या 'इशाऱ्या'ने हशा
नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी सुरू आहे. आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचक टीका केली. याच दरम्यान आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटाचे नेते, आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची फिरकी घेतली आहे. "अहो गोगावले, माझ्या बोलण्यात जेवढा डिस्टर्बन्स आणाल तेवढं मंत्रिपद दूर जाईल" असं म्हटलं आहे.
अजितदादांच्या या 'इशाऱ्या'नंतर सर्वच जण हसले. अजित पवार भाषण करत असतानाच भरत गोगावले यांनी काहीतरी म्हटले. त्याला उत्तर देताना अजितदादांनी टोला लगावला आहे. "भरत गोगावले, तुम्हाला कितीदा सांगितले. माझ्यामध्ये डिस्टर्बन्स आणू नका. जेवढी मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल. तुम्हाला माहीत नाही माझे आणि एकनाथरावांचे काय संबंध आहेत. तुम्ही आमदार आहात जरा समजून घ्या हो..." असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
"मागच्या काळामध्ये झालं.. झालं गेलं गंगेला मिळालं... उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही... तेच तेच सांगत बसण्यापेक्षा नवीन वर्षं २०२३ सुरू होतंय...राज्याचे प्रमुख या नात्याने निर्णय घ्या... कुणी काही बोलत असतील, तर ते माझे प्रवक्ते बघतील.. दीपक केसरकर आहेत ना वस्ताद बोलायला.. ते आठी पडू देत नाहीत, हसत नाहीत, रडत नाहीत... शांतपणे उत्तर देत असतो.. जिथे खोच मारायची तिथे बरोब्बर मारतो. अशी चांगली आम्ही तयार केलेली माणसं तुम्ही घेतली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी द्या..."
"राज्याच्या १३ कोटी जनतेचे प्रमुख आहात. मुख्यमंत्री आहात... देशाच्या राजकारणात दोन नंबरचं पद महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद... महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा. ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्याची जबाबदारी शिंदे साहेब तुमच्यावर आहे. पुन्हा विचार करा. आपण आपलं चालत राहायचं, बोलणारे बोलत असतात. जनता व्यवस्थित समजून घेते" असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"