नागपूर - विधानसभेत राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी ६० वेळा माझं सरकार असा उल्लेख केला. हे तुमचे सरकार कसे झाले याचा विचार करा. सरकार कुठलेही असले तरी ते राज्यपालांना ते म्हणावे लागते. राज्यपाल हे एका पक्षाचे आहेत परंतु त्यांनी पदाचा मानसन्मान राखला पाहिजे असं विधान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत विरोधक वैफल्यग्रस्त झालेत असा टोला लगावला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खडाजंगीत विधानसभा तालिका अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचे विधान रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आदेश दिले.
राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, या सरकारने ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता शपथ घेतली. सर्वसाधारणपणे राज्यात निवडणूक झाली, सरकार अल्पमतात आले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर राज्यातील सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला राज्यपालांनी निमंत्रित करावे लागते. राज्यपालांनी निमंत्रित केले नाही तर जो पक्ष सरकार बनवू इच्छितो त्यांनी आपल्याला समर्थन देणाऱ्या पक्षांची, आमदारांची यादी घेऊन राज्यपालांकडे जावे लागते. राज्यपालांना सांगावे लागते, आम्ही सरकार बनवू इच्छितो, आम्हाला निमंत्रित करा. जर ते गेले नाहीत मोठ्या पक्षाला विचारायचं असते, आपण सरकार बनवू इच्छिता का? सरकार बनवताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते. या तारखेला, या वेळेला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपालांनी सांगायचे असते. जागा बदलायची असेल तर राज्यपालांना विनंती करावी लागते. राज्यपाल हे घटनात्मक आणि संविधानिक पद आहे असं म्हटलं जातं. मी टीका करत नाही परंतु आपण घटनेचे महत्त्व किती किमी करतोय. तुमच्या मनात घटनेबद्दल आदर नाही हे आम्ही सातत्याने सांगतोय. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे की नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलवले, राज्यपालांकडे तुम्ही यादी घेऊन कधी गेलात हे महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. राज्यपालांकडे तुम्ही गेलात नाही ही माझी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवड कधी झाली, ४ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक झाली. त्यात निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते राज्यपालांकडे गेले आम्हाला शपथ घ्यायची आहे. पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानात शपथविधीच्या मंडपाचे काम सुरू झाले. तिथे शपथविधी घ्यायचा हे कुणी ठरवले, राज्यपाल हे घटनात्मक पद असेल तर त्याचा अधिकार काय हा माझा धोरणात्मक प्रश्न आहे. २२ मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री येणार आहेत त्यांच्या तारखा जाहीर झाला. दौरा निश्चित झाला तरीही राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारे शपथविधीची अधिसूचना निघाली नाही. राज्यपालांना इतके गृहित धरता, राज्यपाल कुठल्यातरी एका पक्षाचे असतात हे मला मान्य आहे पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा, मानसन्मान राहिला पाहिजे. या पदाचे महत्त्व राहिले पाहिजे याचे भान राज्यपालांना आहे की नाही...? असा सवाल उपस्थित केला.
त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पाँईट ऑफ ऑर्डर मांडून भास्कर जाधव हे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतायेत की वैफल्यग्रस्त भाषण करतायेत यावर मी बोलत नाही. राज्यपाल हे एका पक्षाचे आहेत, त्यांच्यावर हेतू आरोप केले जातायेत त्यांचे हे वाक्य रेकॉर्डवरून काढून टाकावे अशी मागणी केली. तर अध्यक्षांच्या निर्णयानंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप कळत नाही. इतके वैफल्यग्रस्त झालेत त्यामुळे अध्यक्ष बोलतायेत त्याचेही भान राहिले नाही. वाक्य तपासण्याची गरज नाही. राज्यपालांवर आक्षेप घेण्याचं काम सुरू आहे हे चुकीचे आहे. सभागृहाच्या परंपरा राखल्या पाहिजे. जे नवीन सदस्य आहेत त्यांना प्रथा माहिती नसतील परंतु भास्कर जाधव हे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांनी सभागृहाची प्रतिमा जपली पाहिजे असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. त्यानंतर विखे पाटील आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
नेमकं काय झालं?
भास्कर जाधव - विरोधकांचं ऐकून घेण्याची सत्ताधाऱ्यांची लेव्हल राहिली नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी सतत उभं राहणे योग्य नाही. तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाने असं बोलावे, तुम्ही कान साफ केले पाहिजे. मला बोलूच दिले जात नाही. अध्यक्षांनी मला संरक्षण दिले पाहिजे. राज्यपालांचं आचारण आणि निर्णय यात खूप तफावत आहे.
विधानसभा तालिका अध्यक्ष - नियम ३४(४) नुसार राज्यपालांच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये, त्यामुळे जे तुम्ही बोलला ते रेकॉर्डवरून काढण्यात येत आहे.
राज्यमंत्री आशिष जैस्वाल - राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सरकार स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायेत. ते सगळे रेकॉर्डमधून काढले जावे.
राधाकृष्ण विखे पाटील - एवढा मोठा जनाधार मिळाला त्यामुळे तुम्ही वैफल्यग्रस्त होऊ नका. लोकांच्या निर्णयाचा स्वीकार करा. आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं काम दाखवू नका. आक्षेपार्ह वक्तव्ये करत असतील तर आम्हाला मान्य नाही. मराठी भाषेबद्दल या लोकांचे किती प्रेम आहे आणि अडीच वर्षात या लोकांनी मराठीसाठी काय काम केले हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या सरकारने दिला. भास्कर जाधवांनी विषयाला धरून बोलावे. सरकारचं यश विरोधकांना पचवता येत नाही. भाषण मुद्द्याला धरून असावे.