टायगर जिंदा है!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:16 AM2019-09-23T04:16:56+5:302019-09-23T04:19:31+5:30

वयाने ऐंशी गाठली, दुर्धर आजाराने शारीरिक हालचालींवर मर्यादा आणली, तरी त्याची पर्वा न करता तरुणांना लाजवेल अशा उत्साह आणि ऊर्जेने शरद पवार पुन्हा मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha 2019 ncp chief sharad pawar fighting lonely against bjp shiv sena | टायगर जिंदा है!

टायगर जिंदा है!

googlenewsNext

- नंदकिशोर पाटील

मोदी लाटेच्या तडाख्यात देशातील अनेक राजकीय गलबतं बुडाली. काही अजून गटांगळ्या खात आहेत. ज्यांनी वादळाची दिशा ओळखून वेळीच उड्या मारल्या, ते कसेबसे किनाऱ्याला लागले. राष्टÑवादी काँग्रेसची अवस्थाही अशाच बुडत्या जहाजासारखी. आपली नौका तरणार नाही याचा पुरता अंदाज आल्याने म्हणा, किंवा तशी भीती वाटल्याने या पक्षातील अनेकांनी उड्या मारल्या. सत्तापक्षाचे जॅकेट (की, गमजा!) अंगात चढविल्याने त्यांना कसेबसे जीवदान मिळाले. पण इतरांनी उड्या मारल्या म्हणून कॅप्टनला जहाज सोडता येत नाही. वाºयाच्या दिशेला शिडं फिरवून आपले जहाज किनाºयाला नेण्याचे अटोकाट प्रयत्न कॅप्टनला करावेच लागतात. शरद पवार सध्या अशा कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. सरदार, मनसबदार आणि किल्लेदारांनी हातातील शस्त्रे टाकून शत्रुपक्षाशी संधान साधल्यानंतर उरल्यासुरल्या मावळ्यांना सोबत घेऊन ते स्वत: मैदानात उतरले आहेत. वयाने ऐंशी गाठली, दुर्धर आजाराने शारीरिक हालचालींवर मर्यादा आणली, तरी त्याची पर्वा न करता तरुणांना लाजवेल अशा उत्साह आणि ऊर्जेने ते पुन्हा मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत. एखादा सेनापती लढाईला निघताना जसा घराच्यांना सांगून निघतो, ‘आलो तर जिंकूनच येईन...नाहीतर वाट पाहू नका!’ तसे पवारही घराच्यांना सांगून निघाले आहेत, ‘निवडणूक होईपर्यंत वाट पाहू नका...अनेकांची जिरवल्याशिवाय परत येणार नाही!’

शरद पवार हे तेल लावलेले पैलवान आहेत. डावपेचात पारंगत आहेत. आजवर त्यांनी अनेकांची पाठ लावली आहे. गेली पन्नास वर्षे राजकीय पटावर डावपेच आखणारा त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही. सध्या त्यांच्या राजकीय ओहोटीचा काळ सुरू असला तरी महाराष्टÑाच्या राजकारणातून ‘शरद पवार’ या षडाक्षरी नावाला वगळता येत नाही. म्हणूनच तर, नरेंद्र मोदी, शहांपासून फडणवीसांपर्यंत साऱ्यांना पवारांचा नमोल्लेख टाळून आपल्या भाषणाची सांगता करता येत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने पवारांनाच टार्गेट केले होते, आता विधानसभेला देखील पवार हेच त्यांचे टार्गेट असल्याचे दिसून येते. वास्तविक, ज्यांचे राजकीय मूल्य अथवा उपद्रव क्षमता संपली अशा नेत्याची दखल घेण्याची गरज नसते. मग राष्टÑवादी काँग्रेस खिळखिळी करून टाकल्यानंतरही शहा, मोदी आणि फडणवीसांना पवार ‘दखलपात्र’ का वाटतात? कारण, पवारांची विजुगिषी वृत्ती! राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले शरद पवार सहजासहजी मैदान सोडणार नाहीत, हे या मंडळींना पुरते ठाऊक आहे. गेल्या चार-आठ दिवसांतील पवारांचा झंझावात पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येतेच. कालपरवापर्यंत जे खाद्यांला खांदा लावून होते त्यांनीच अडचणीच्या काळात साथ सोडल्यानंतर एखाद्या नेत्याने अंथरुन धरले असते किंवा राजकीय विजनवास तरी पत्करला असता. पण पवारांनी अजून मैदान सोडलेले नाही. दुसºया-तिसºया फळीतील तरुणांना सोबत घेऊन ते लढाईत उतरले आहेत. निवडणुकीत हार-जीत होत राहते, पण म्हणून पराभवाच्या भीतीने लढाईच्या आधीच पळ काढायचा नसतो, हा धडा त्यांनी नव्या पिढीला यानिमित्ताने घालून दिला आहे. पवारांसाठी ही लढाई तशी सोपी नाही. यावेळी केवळ विरोधकच नव्हे, तर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासारखे नातलग आणि स्वकीय देखील समोर असणार आहेत. पण पवारांना त्याची पर्वा नाही. बीड, उस्मानाबाद, सोलापूरमध्ये त्यांनी ज्याप्रकारे पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा समाचार घेतला आणि बघून घेण्याची भाषा केली, त्यावरून ते किती पेटून उठले आहेत हे दिसून येते. राष्टÑवादीतून बाहेर पडलेले बहुतेक नेते हे साखर कारखानदार आहेत. आजवर त्यांची कारखानदारी पवारांच्या मध्यस्तीने मिळणाºया ‘पॅकेज’वरच तग धरून होती. मात्र सत्ता बदलताच, हे कारखानदार अडचणीत आले. ज्यांनी कारखाने गाळात घातले, त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. पण पक्षांतरामुळे सरकारी कारवाई टळली असली तरी जनतेच्या न्यायालयाचा निकाल अजून बाकी आहे. मतदारांना गृहित धरून इकडूून-तिकडे उड्या मारणाºया दलबदलूंना प्रत्येकवेळी यश मिळेलच असे नाही. श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुतेंचे उदाहरण ताजे आहे.

शरद पवारांच्या राजकीय भूमिकांविषयी दूमत असू शकते. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पाठराखण करणाºया या नेत्याने जातीयवादी भूमिका घेतलीच नाही, असे नाही. उलट ज्या-ज्या वेळी इतरेजणांच्या राजकीय अस्तित्वाची अडचण झाली, तेव्हा-तेव्हा त्यांच्या तोंडून तसे अनुद्गार बाहेर पडले आहेत. मग ते शरद जोशी, मनोहर जोशी, राजू शेट्टी असोत की देवेंद्र फडणवीस! मुख्यमंत्री फडणवीस यांचा नामोल्लेख न करता ‘पूर्वीच्या काळी आमच्या घरी खतावणी करणारे लोक होते’ हे त्यांचे ताजे वक्तव्य त्यांच्या पुरोगामी भूमिकेला साजेसे नाही. तरीही पवार असे का बोलून जातात? कारण पवारांच्या राजकारणाचे ते हुकमी हत्यार आहे. पण हे हत्यार बोथट करण्यात गेल्या पाच वर्षात सत्ताधाºयांना बºयापैकी यश आले आहे. किंबहुना, पवारांच्या राजकीय ‘बैठकी’चे जाजमच त्यांनी आपल्याकडे खेचून घेतले आहे. नाशिकच्या सभेत छत्रपतींचे वंशज उदयनराजे यांच्या हस्ते मानाची पगडी परिधान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जे उद्गार काढले, ते पुरेसे बोलके आहे. राजकारणातील भाकरी फिरवण्याची भाषा पवारांनी अनेकदा केली; मात्र उमेदवारी देण्याची वेळ आली की, निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषावर त्याच त्या चेहºयांना, घराण्यांना पुन्हा-पुन्हा संधी दिली. त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यात राजकीय सुभेदार तयार झाली. गुणवत्ता, क्षमता आणि इच्छाशक्ती असलेल्या इतरांना दोन-दोन पिढ्या संधी नाकारली गेली. अशा नाकारल्या गेलेल्या तरुणांनीच कुठे शिवसेनेचा भगवा हाती घेतला तर कुठे भाजपचे कमळ हाती धरले. आता तर राष्टÑवादीच्या या सुभेदारांनीच पवारांची साथ सोडली आहे. पवारांनी वेळीच भाकरी फिरवली असती तर ही वेळ आलीच नसती. आता ते पुन्हा नव्या दमाने नवं राजकीय बियाणं पेरण्याच्या तयारीला लागले आहेत. ‘शरद सीडलेस’ या संकरित द्राक्ष वाणानं शेतकºयांना अल्पावधीत भरघोस उत्पादन मिळवून दिलं. तद्वत पवारांच्या नव्या राजकीय बियाण्याला किती उतारा मिळतो, हे या हंगामानंतर कळेलच. पण सध्या शरद पवारांच्या फोटोसह सोशल मीडियावर एक मेसेज फिरतोय. तो असा-
‘हमको मिटा सके, ये जमाने में दम नहीं
कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं,
टायगर अभी जिंदा है!’

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 ncp chief sharad pawar fighting lonely against bjp shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.