Maharashtra Vidhan Sabha 2019 - MNS finally decided; The engine will run soon after the desired rating | Vidhan Sabha 2019 : मनसेचं अखेर ठरलं; इच्छुकांच्या रेट्यानंतर इंजिन लवकरच धावणार
Vidhan Sabha 2019 : मनसेचं अखेर ठरलं; इच्छुकांच्या रेट्यानंतर इंजिन लवकरच धावणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवावी, असा बहुतांश कार्यकर्त्यांचा आग्रह धरला आहे. चर्चेवेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तशी भावना बोलून दाखविली आहे. मात्र, निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरे हेच घेणार असून तेच याबाबतची घोषणा करतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी दिली.
दादर येथील राजगड या पक्ष कार्यालयात आज मुंबईतील विभाग अध्यक्ष, पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक झाली. राज ठाकरे या बैठकीस उपस्थित नव्हते. मात्र, अमित ठाकरे यांनी काहीवेळ बैठकीस हजेरी लावली होतीे. या बैठकीनंतर नांदगावकर म्हणाले, यापूर्वीही आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आज मुंबईतील विभागाध्यक्षांच्या बैठकीतही मते जाणून घेतली. निवडणूक लढवावी, असाच बऱ्याच जणांचा कल आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि आमचा अहवाल आम्ही सादर करणार आहोत. त्यानंतर निवडणूक लढविण्याबाबत राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील.
आधी निवडणूक लढविण्याचा निर्णय होऊ द्या. त्यानंतर किती जागा लढचायच्या, कोणत्या लढवायच्या किंवा आघाडी करायची की नाही, हे ठरविता येईल, असे नांदगावकर यांनी सांगितले.
> शंभर जागा लढविणार
मनसेने शंभर जागांची तयारी चालविली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबादसह निवडक ठिकाणी उमेदवार उतरविण्याची चाचपणी सुरू आहे. मुंबईबाहेरील इच्छुकांनी यापुर्वीच मोर्चेबांधणीला सुरूवात केली होती. इच्छुकांच्या नावासह प्राथमिक अहवाल राज यांनी पदाधिकाऱ्यांकडून मागविला आहे. सर्व जागा स्वबळावर लढविण्याची भाषा करण्यात येत असली तरी काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीशी विशेष समन्वय साधण्याची भूमिका असल्याची माहिती सुत्रांनी दिली.


Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - MNS finally decided; The engine will run soon after the desired rating
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.