महाराष्ट्रात सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:09 IST2019-09-25T04:07:08+5:302019-09-25T07:09:27+5:30
नवीन मोटार वाहन कायद्याचा परिणाम; मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील चालकांनाही लागले वळण, सेव्ह लाइफ फाउंडेशनचे सर्वेक्षण

महाराष्ट्रात सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले
मुंबई : वाहन चालविताना सीटबेल्ट घालण्याबाबत अनेकदा जनजागृती करूनही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करत होते. नवीन मोटार वाहन कायदा लागू होण्यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ८२ टक्के बस चालक सीटबेल्ट वापरत नव्हते. कायदा लागू झाल्यानंतर हे प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत घटले आहे. सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियामांचे उल्लंघन केल्यास यापूर्वीच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ केल्याने आता वाहनचालक नियम पाळू लागल्याची चर्चा आहे.
दिल्ली येथील बुरारी, भालसवा आणि मुकुंदपूर चौक तसेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे व जुना-मुंबई पुणे हायवेचा सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेच्या वतीने अभ्यास करण्यात आला होता. महाराष्ट्र आणि दिल्लीत नवीन वाहन कायदा लागू होण्यापूर्वी ११९० वाहनांचे निरीक्षण करण्यात आले. तर कायदा लागू झाल्यानंतर १,२९४ वाहनांचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये सीटबेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणे, हेल्मेट न वापरणे, अत्यावश्यक वाहनांना जागा न देणे, फोनवर बोलणे आदी बाबींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व वाहनांमध्ये सरासरी सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले. यामध्ये बसचालकांचे प्रमाण ५० टक्क्यांहून ७६ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर ट्रक चालकांमध्ये सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण २१ टक्के वाढले आहे.
नवीन कायदा लागू होण्यापूर्वी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ८२ टक्के बसचालक सीटबेल्ट वापरत नव्हते. कायदा लागू झाल्यानंतर हे प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत घटले. अवैध प्रवासी वाहतूक करण्याच्या घटनांमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ८० टक्के कारचालक सीटबेल्ट वापरत नव्हते. कायदा लागू झाल्यावर त्यामध्ये ५ टक्क्यांनी घट झाली. कारमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होत होती. ती आता १० टक्क्यांवरून १ टक्क्यापेक्षाही कमी झाली आहे. ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मालवाहतूक करण्याचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आले. तर सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १३ टक्क्यांवरून ३.३ टक्क्यांवर आले आहे. जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे तर अवैध मालवाहतूक २ टक्क्यांनी कमी झाली आहे.
हेल्मेट घालणाऱ्यांमध्येही वाढ
कार चालकांवर कायद्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. तर, १० टक्के ट्रक चालकांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये नवीन कायदा लागू झाल्यानंतर बुहारी चौकात सीटबेल्ट वापरण्याचे प्रमाण १५.६ टक्क्यांनी वाढले. ८८ टक्के बसचालकांनी सीटबेल्ट वापरण्यास सुरुवात केली. भालसवा चौकात हेल्मेट वापरण्यात १० टक्के वाढ झाली. दुचाकीवर अवैध मालवाहतूक करण्याचे प्रमाण २ टक्क्यांनी घटले तर बसमध्ये हे प्रमाण १० टक्क्यांनी घटले.