Maharashtra Unlock News: राज्यात सोमवारपासून 'अनलॉक'; सरकारकडून नियमावली जाहीर, पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 03:04 IST2021-06-05T02:38:53+5:302021-06-05T03:04:57+5:30
Maharashtra Unlock News: मुख्य सचिवांकडून आदेश प्रसिद्ध; पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी

Maharashtra Unlock News: राज्यात सोमवारपासून 'अनलॉक'; सरकारकडून नियमावली जाहीर, पाच स्तरांवर होणार अंमलबजावणी
मुंबई - राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला.
३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे. प्रत्येक आठवड्यात या दोन निकषांवर जिल्ह्यांची वर्गवारी करून नियमावलीनुसार निर्बंध शिथिल वा कडक केले जाणार आहेत. एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत.
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨 pic.twitter.com/Vi8WvkDuqi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. पण त्यानंतर काहीच तासात राज्य शासनाने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारी गोंधळ समोर आला होता. मात्र, अखेर शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली.
मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (ग्रामीण- मुंबई वगळता) हे नियमावलीसंदर्भात स्वतंत्र आदेश काढतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
पाच टक्क्यांपेक्षा कमी कोरोना पॉझिटिव्हीटी दर आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. हा पहिला स्तर मानला जाईल. पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर आहे आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड भरलेले आहेत ते दुसऱ्या स्तरात मोडतील. पाच ते दहा टक्के पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, असा तिसरा स्तर मानला जाईल. तेथील व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.
🚨Level of restrictions for breaking the chain 🚨 pic.twitter.com/EQ8SVmHO77
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 4, 2021
दहा ते वीस टक्के पॉझिटीव्हीटी दर असेल आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील असा चौथा स्तर मानला जाईल आणि तेथे सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील. २० टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हीटी रेट असेल आणि ७५ टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील, तो पाचवा स्तर असेल.
पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील. तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील. पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.
३ जून रोजी संपलेल्या आठवड्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण
जिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)
नगर २४.४८ ४.३०
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
औरंगाबाद २०.३४ ५.३८
बीड ४७.१४ ८.४०
भंडारा ४.४१ ७.६७
बुलडाणा ७.७१ १०.०३
चंद्रपूर ९.३० ३.०९
धुळे ४.२५ २.५४
गडचिरोली ५.९२ ६.५१
गोंदिया ६.३२ २.३७
हिंगोली २९.३४ ४.३७
जळगाव १५.१७ १.६७
जालना १७.६५ २.०५
कोल्हापूर ७१.५० १५.२५
लातूर १५.१३ ४.२४
मुंबई उपनगर १२.५१ ५.२५
नागपूर ८.१३ ३.८६
नांदेड ४.२८ १.९३
नंदुरबार २९.४३ ३.३१
नाशिक १८.७१ ७.७५
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
पालघर ४८.९३ ५.११
परभणी १६.०२ ७.१०
पुणे २०.४५ १३.६२
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०
सोलापूर ४४.३९ ६.७८
ठाणे १९.२५ ७.५४
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९
यवतमाळ १३.५८ ४.१९