आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल!
By Admin | Updated: July 4, 2014 08:54 IST2014-07-03T16:13:01+5:302014-07-04T08:54:15+5:30
भारतात आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असून आत्महत्या करण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.

आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल!
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ - भारतात आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असून आत्महत्या करण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. देशात प्रत्येक वर्षी एक लाख लोक आत्महत्या करीत असून २१.६ टक्क्याने यामध्ये वाढ झाल्याची माहिती सरकारने दिलेल्या एका अहवालातून समोर आली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरोने दिलेल्या आकडेवारीवरून देशात प्रत्येक तासाला १५ व्यक्ती आत्महत्या करीत आहे. २००३ मध्ये हा आकडा १ लाख १०,८५१ इतका होता तो आता २०१३ साली १ लाख ३४ हजार ७९९ इतका झाला आहे. दहा वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा दर १५ टक्के इतका आहे तर २०१३ मधील आत्महत्येच्या घटनांमध्ये ५.७ टक्के इतकी वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत. २०१३ मध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल १६,६२२ जणांनी आत्महत्या केल्या असून त्यापाठोपाठ तमिळनाडुमध्ये १६,६०१ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच आंध्र प्रदेशात १४ हजार ६०७ जणांनी तर पश्चिम बंगालमध्ये १३ हजार ०५५ जणांनी आपले जीवन संपवले आहे. कर्नाटकातही ११हजार २६६ जणांनी आत्महत्या केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्येही आत्महत्येचे प्रमाण दिसत असून यामध्ये चेनईमध्ये २ हजार ४५० जणांनी सर्वाधिक आत्महत्या केल्याचे आढळून आले असून त्यापाठोपाठ बंगळुर २ हजार ०३३, दिल्ली १ हजार ७५३ आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात १ हाजर ३२२ जणांनी आपले जीवन संपवले आहे. या आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक समस्या व आजारपण ही दोन मुख्य कारणे असून बेरोजगारी, कर्ज व अंमली पदार्थांचे सेवनदेखील कारणे असल्याचे अहवालात म्हटंले आहे.