लॉटरी बंद करू नका, सहकारी तत्त्वावर चालविण्याची विक्रेत्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 06:01 IST2025-01-21T06:01:06+5:302025-01-21T06:01:41+5:30
Maharashtra State lottery: राज्य शासन महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, महाराष्ट्रातील हजारो विक्रेत्यांचा त्यास विरोध आहे.

लॉटरी बंद करू नका, सहकारी तत्त्वावर चालविण्याची विक्रेत्यांची भूमिका
मुंबई - राज्य शासन महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, महाराष्ट्रातील हजारो विक्रेत्यांचा त्यास विरोध आहे. तरीही असा निर्णय घेतला गेल्यास लॉटरी विक्रेते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा लॉटरी विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिला.
आकर्षक जाहिराती, अद्ययावत प्रचार यंत्रणा, सर्वाधिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पुरस्कार, बक्षिसे, परराज्यात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रीसाठी प्रयत्न, असे काही उपाय केल्यास लॉटरीची विक्री वाढू शकते; पण शासन त्याऐवजी लॉटरी बंद करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप संघटनेने केला.
महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा सरकारचा इरादा असेल तर विक्रेते सहकारी तत्त्वावर लॉटरी चालविण्यास तयार आहेत. बंद करण्यापेक्षा विक्रेतेच संचालकांच्या भूमिकेत शिरतील. त्यासाठी ‘एक पर्याय’ उपलब्ध आहे. विक्रेत्यांना विश्वासात घेऊन सरकारने एका उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. बंद करण्याचा प्रस्ताव रद्द करावा.
- विलास सातार्डेकर, नेते, लॉटरी विक्रेते
लॉटरीचे लाभ
- राज्य लॉटरीमुळे ग्राहकांना आकर्षक रोख बक्षिसे मिळतात. विक्रेत्यांना चांगले कमिशन मिळते आणि राज्य सरकारला विकासकामासाठी महसूल मिळतो.
- राज्य लॉटरीपासून राज्याला दरवर्षी जीएसटी व इतर मार्गांनी अंदाजे २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, तसेच परराज्यातील लॉटरीमुळे १०० ते १२५ कोटी - रुपयांचा जीएसटी दरवर्षी मिळतो.
- गेल्या पाच वर्षांत ६५० ग्राहक लखपती, तर १० ग्राहक करोडपती झाले आहेत, असा दावा विक्रेत्यांनी केला.