ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:30 IST2025-12-24T17:30:10+5:302025-12-24T17:30:38+5:30
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या विभागांसाठी काय निर्णय घेण्यात आले? जाणून घ्या...

ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Maharashtra Cabinet Meeting: राज्यभरातील सर्व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ठाकरे बंधूंची युती अखेरीस जाहीर करण्यात आली. दुसरीकडे काँग्रेसने राष्ट्रीय समाज पक्षाशी आघाडी केली. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घडामोडी घडत असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी, एक एकर जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार, तसेच मताचाही अधिकार मिळणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले चार महत्त्वाचे निर्णय
- ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)
- राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)
- धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)
- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)