महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र तिसरा, जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित

By मनीषा म्हात्रे | Published: June 18, 2023 11:50 AM2023-06-18T11:50:48+5:302023-06-18T12:09:01+5:30

धक्कादायक बाब म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. 

Maharashtra ranks third in violence against women, unprotected from intimates | महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र तिसरा, जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित

महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र तिसरा, जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित

googlenewsNext

दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करत घडलेल्या हत्येच्या घटनेने मुंबई हादरली. त्यापाठोपाठ परीक्षेला निघालेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर लोकलमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. 

महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचे नाव सुरुवातीच्या तीन राज्यांमध्ये येते. एनसीआरबीच्या २०२१ च्या आकडेवारीनुसार, देशात महिलांवरील अत्याचारांचे एकूण ४ लाख २८ हजार १७८ गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात (५६,०८३) त्यानंतर राजस्थान (४०,७३८) आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक (३९,५२६) लागतो.
हल्ले आणि त्यांच्या विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे ओडिशामध्ये (१४,८५३) त्यानंतर महाराष्ट्रात (१०,६५८) नोंदवण्यात आले होते.
बलात्कारांच्या घटनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा (२,४९६) देशात चौथा क्रमांक लागतो. या यादीत राजस्थान (६,३३७), मध्य प्रदेश (२,९४७) आणि उत्तर प्रदेश (२८४५) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
बाललैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही महाराष्ट्रात (६,११६) उत्तर प्रदेशानंतर (६,९७०) सर्वांत जास्त गुन्हे नोंदवण्यात आले.

जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये आरोपी हे नातेवाईक, शेजारी, परिचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील महिला जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित असल्याचेही वेळोवेळी पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.

महिला आयोगाकडून तक्रारींचा निपटारा
राज्य महिला आयोगाकडे ऑक्टोबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान १६,६२९ तक्रारी आल्या. त्यापैकी १५ हजार ९२३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ७०६ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक १,०८६ तक्रारींची नोंद झाली होती. यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ८,९५७ गुन्हे नोंद झाले. तर, यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान ४,८६३ तक्रारींचा समावेश आहे. 

 

Web Title: Maharashtra ranks third in violence against women, unprotected from intimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.