Maharashtra Preparing For 3rd Covid Wave Minister Aaditya Thackeray oxygen and remdesivir problem solved | महाराष्ट्रात परिस्थिती स्थिर; रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा दूर होतोय; आदित्य ठाकरे यांची माहिती

महाराष्ट्रात परिस्थिती स्थिर; रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा दूर होतोय; आदित्य ठाकरे यांची माहिती

ठळक मुद्देराज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर झाल्याची आदित्य ठाकरेंची माहिती.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. दरम्यान, आता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर आहे, असं प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसंच सध्या रेमडेसिवीरचा होत असलेला काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रासोबत आणि काही कंपन्यांच्या सहकार्यानं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रशासनानं चर्चा केली आणि आता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता दूर झाली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याचा विचारही केला नव्हता. आता आपल्याला तिसऱ्या लाटेबाबतही तयार राहावं लागणार असल्याचंही ते म्हणाले. 

सध्या लोकांमध्ये इतकी भीती बसली आहे की हलकी लक्षणं असलेल्या लोकांनाही रुग्णालयात जायचं आहे. बेड्स बाबत किती सोय करण्यात आली आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. "जंबो सेटर्स महाराष्ट्रातच सर्वात पहिले उभारण्यात आले. ५ लाखांच्या आसपास महाराष्ट्रात बेड्स तयार केले गेले आहेत. लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणं आवश्यक आहे. उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता दिसणार नाही कारण टास्क फोर्सच सारखीच आहे," असं उत्तर देताना ते म्हणाले. एनडीटीव्हीनं आयोजित केलेल्या NDTV Solutions Summit या कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

काही तरूण निष्काळजी

"ज्या तरूणांना कोरोनाच्या प्रसाराची भीती नाही ते निष्काळजीपणे वागत आहे. त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. पण हे सर्दी, खोकला नाही. अशी काही लोकंही पाहिली ज्यांनी चाचणी केली नाही आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा आजार बिलकुल हलक्यारितीनं घेऊ नये. डॉक्टर आणि प्रशासनावर भरवसा ठेवावा आणि काळजी घ्यावी," असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. 

प्रवासी मजुरांवरही भाष्य

"गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक प्रवासी मजूर महाराष्ट्रातून परतले होते. परंतु यावेळी आम्ही ये-जा थांबवली नाही. यावेळी त्यावेळसारखी परिस्थिती नाही. गेल्या लॉकडाऊनमधून सर्वांनीच धडा घेतला आहे. आता परिस्थिती पहिल्यापेक्षा ठीक आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Preparing For 3rd Covid Wave Minister Aaditya Thackeray oxygen and remdesivir problem solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.