Maharashtra Politics ( Marathi News ) : आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानावर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते. एकीकडे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का? भाजपा नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का?, अशी टीका आमदार पवार यांनी केली.
"निवडणुकीआधी नरमी दाखवणारे, कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्ता मिळवणारे आता शेतकऱ्यांवरच खालच्या भाषेत बोलून गुरगरत असतील तर अशा लबाड लांडग्यांना शेतकऱ्यांचा आसुड दाखवावाच लागेल, असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आमदार बबनराव लोणीकर यांचं विधान काय?
एका कार्यक्रमात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यां संदर्भात वादग्रस्त विधान केले. "ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?", असं वादग्रस्त विधान आमदार लोणीकर यांनी केले.