CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:41 IST2025-11-06T12:38:41+5:302025-11-06T12:41:14+5:30
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांवर आणि शेतकऱ्यांच्या भेटीगाठींवरून थेट टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 'कारपेट' सोडले नाही. सततच्या पराभवानंतर त्यांना लोकांमध्ये जावे लागत असल्याची जाणीव झाली. म्हणूनच ते घराबाहेर पडले आहेत,असा टोला फडणवीसांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांनावर संकट आले होते, त्यावेळेस ते कारपेटवरून खाली उतरले नव्हते. आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांच्या लक्षात आले आहे की, लोकांमध्ये जावा लागते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहिती आहे की, हे लोक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याठिकाणी आलेले आहेत. त्यांना जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणून लोक पकडून आणण्याचे काम त्याठिकाणी सुरू आहे,' अशीही त्यांनी टीका केली.
शेतकऱ्यांच्या मदत पॅकेजबाबत बोलताना फडणवीस यांनी सरकारी उपाययोजनांचा बचाव केला, तसेच विलंबाचे कारणही स्पष्ट केले. "सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे. हे खरं आहे की, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पॅकेज पोहोचले नाही, त्यामुळे त्यांच्यात संभ्रम आहे. पण, आरबीआयच्या नियमानुसार दररोज ६०० कोटी रुपये आम्हाला द्यावे लागतात. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवाय, उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही, असे भाकीत त्यांनी वर्तवले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत ही फसवणूक असल्याचे म्हटले. "राज्य सरकारकडून नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेले सर्वांत मोठे पॅकेज नाही, तर शेतकऱ्यांना दिलेला आजवरचा सर्वांत मोठा दगा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती दिली पाहिजे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मात्र, ती मदत शेतकऱ्यांना न मिळाल्याने सरकारचा खरा चेहरा उघडा पाडण्यासाठी मी आलो आहे", असे उद्धव ठाकरे म्हणाले.