राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर १५ दिवसांतल्या घडामोडी दिसल्या नसत्या : संभाजीराजे छत्रपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 14:10 IST2022-06-22T14:06:04+5:302022-06-22T14:10:41+5:30
एकीकडे राज्यात आमदारांचं बंड आणखी तीव्र होत असतानाच दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर १५ दिवसांतल्या घडामोडी दिसल्या नसत्या : संभाजीराजे छत्रपती
राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील एक ट्वीट केलं आहे. राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
“आज राजकीय कशाला बोलायचं. कोणतंही सरकार येऊ देत, त्यांनी सामान्यांचं, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत एवढीच माझी येणाऱ्या सरकारकडे विनंती असेल,” असं संभाजीराजे म्हणाले. एबीपी माझाशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंसोबत २५ टक्के आणि ७५ टक्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “ही धगधग अनेक वर्ष सुरू होती. मला जर त्यांनी राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर गेल्या १५ दिवस दिसणाऱ्या घडामोडी दिसल्याच नसत्या. वेगळाच मार्ग झाला असता. जे कोण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होती, त्यांनी सामान्यांची कामं करावी.”
“मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून बोललो होतो आणि काय हवं आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळलाच नाही याबाबत कोणतंही दुमत नाही,” असंही त्यांनी उमेदवारी नाकारल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.