ड्रग्ज तस्करांच्या 'टार्गेट'वर महाराष्ट्र; महाराष्ट्रात हायब्रिड गांजाची तस्करी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:55 IST2025-07-25T12:55:13+5:302025-07-25T12:55:42+5:30
Nagpur : कर्नाटक व गुजरातनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

Maharashtra on the 'target' of drug smugglers; Smuggling of hybrid cannabis has increased in Maharashtra
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात अमलीपदार्थाच्या तस्करीची नवी रूपं समोर येत असून, उच्च क्षमतेच्या हायब्रिड गांजाची मागणी आणि तस्करी झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र तस्करांच्या टार्गेटवर असून, यावर्षी राज्य हायब्रिड गांजाच्या तस्करीप्रकरणी देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा गांजा प्रामुख्याने थायलंडवरून येत असून, बरेचदा तस्करीसाठी हवाई मार्ग किंवा कुरिअरचादेखील वापर करण्यात येतो, अशी माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाची ही अधिकृत आकडेवारी यंत्रणेची झोप उडविणारी आहे. २०२३ पासून हायब्रिड गांजाच्या तस्करीचे प्रमाण वाढले. तस्करांकडून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आणि या वर्षी गुजरातवरदेखील भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीनही राज्यांची सीमा लागूनच असल्याने तस्करांकडून हवाई मार्गाने आलेला हायब्रिड गांजा रस्तेमार्गाने इतर ठिकाणी पाठविण्यात येतो. २०२३ पासून ते मे २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात १३७.७९७ किलो हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला आहे, तर दाखल झालेल्या ४५ गुन्ह्यांत १९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. २०२५च्या पहिल्या पाच महिन्यांतच ४६ किलो हायब्रिड गांजा जप्त झाला.
थायलंडहून थेट होते तस्करी
हायब्रिड गांजाचे उत्पादन हे प्रामुख्याने थायलंडमध्ये होत आहे. तेथून आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवा किंवा मानववाहक पार्सलद्वारे गांजा भारतात आणण्यात येतो. भारतात गांजा आल्यावर तो ड्रग पेडलर्सच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचविला जात आहे.
कर्नाटक व गुजरातनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक
२०२५ मध्ये मेअखेरपर्यंत देशभरात ३७३ किलो हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला असून, ५६ प्रकरणांमध्ये ७७ अटक करण्यात आल्या आहेत. कर्नाटक (१५८ किलो), गुजरात (८५ किलो) या राज्यांनंतर महाराष्ट्र (४६ किलो) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हायब्रिड गांजा म्हणजे काय ?
- हायब्रिड गांजाला 'हायड्रोपॉनिक गांजा' असेही म्हटले जाते. याची लागवड मातीत न करता, पोषक द्रवपदार्थांमध्ये नियंत्रित वातावरणात केली जाते.
- हा गांजा अधिक तीव्र व जास्त नशा देणारा असतो तसेच याचे अनेक दुष्परिणामदेखील असतात. याचे प्रमाण भारतात वाढत असून, तरुणांमध्ये याची मागणी वाढते आहे.
हायब्रिड गांजाच्या तस्करीत जप्त माल (किलोमध्ये)
राज्य २०२३ २०२४ २०२५ (मेपर्यंत)
कर्नाटक ८.४ ५६ १५८
तामिळनाडू १३४.२९ ६ ५४
महाराष्ट्र १९.४७५ ७२.३२२ ४६
गुजरात ५.९५७ २२.३२६ ८५