'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:52 IST2025-12-21T15:51:44+5:302025-12-21T15:52:36+5:30
Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election 2025 : 'भाजपने सेंच्युरी मारली, शिवसेनेने हाफ सेंच्युरी मारली आहे. आमचा स्ट्राईक रेट विरोधकांपेक्षा चांगला.'

'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Election 2025 : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज हाती आले. सुरुवातीपासूनच भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्यभरातील एकूण नगरपरिषदांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंचाशिवसेना पक्ष वियजी झाला आहे. या विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपची सेंच्युरी, शिवसेनेची...
मीडियाशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, जसे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले, त्याचप्रकारे नगरपालिका आणि नगर पंचाययतींच्या निवडणुकीत मिळाले आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करतो. भाजपलाही चांगले यश मिळाले आहे. भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. भाजपाने सेंच्युरी मारली, तर शिवसेनेने हाफ सेंच्युरी मारली आहे. असेच यश आगामी महापालिका निवडणुकीत मिळेल, असे संकेत आजच्या निकालातून मिळत आहेत, अशा आशा शिंदेंनी व्यक्त केली.
◻️LIVE | 🗓️ 21-12-2025 📍 ठाणे 📹 पत्रकारांशी संवाद https://t.co/somkEhMVth
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2025
घराघरात धनुष्यबाण पोहोचला
ते पुढे म्हणथात, कमी जागा लढवूनही आम्ही जास्त जागा जिंकल्या आहेत. मविआच्या एकूण जागांची बेरीज धरली, तरी ती शिवसेनेच्या जागांपेक्षा कमी आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेटही चांगला राहिला. शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही, ती घराघरात चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचली आहे. लहान लहान शहरांमध्येही शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचला आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील वाढला आहे. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांना मी धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
घरी बसणाऱ्यांना...
यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले, जे लोक या निवडणुकीत घरी बसले होते, ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते, त्या लोकांना मतदारांनी घरी बसवले. लोकांना काम करणारा नेता हवा असतो, घरी बसणारा नाही. काम करणाऱ्या नेत्यांना मतदान केले, घरी बसणाऱ्यांना घरी बसवले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. मी आमच्या नेत्यांना सांगितले होते की, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहा, त्याप्रमाणे नेत्यांनी केले. आम्ही पक्षासाठी काम करणाऱ्या तळागळातील कार्यकर्त्यांना तिकीटे दिली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेनेही आम्हाला साथ दिली. काही ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्र, तर काही ठिकाणी वेगवेगळे लढलो, पण शेवटी महायुती जिंकली आहे. हीच आमच्या कामची पोचपावती आहे. सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो, असे शिंदे यावेळी म्हणाले.