पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:28 IST2025-12-22T06:26:21+5:302025-12-22T06:28:21+5:30
Maharashtra Nagar Parishad Election Results news:भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
चंद्रपुरात मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, खा.प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. ११ पैकी ७ ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली. भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षाने माझी शक्ती कमी केली, मुनगंटीवार यांची नाराजी
हा पराजय मी नम्रपणे स्वीकारतो. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण तयार होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणामध्ये दिसले, असे मुनगंटीवार म्हणाले.
पटोले अन् फुके यांनी जिंकली मने
गोंदिया जिल्ह्यात गोंदियासह तीन ठिकाणी काँग्रेसने
विजय मिळवत भाजप आणि अजित पवार गटाला धक्का दिला, याचे श्रेय माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना दिले जात आहे.
बाजूच्या भंडारा जिल्ह्यात भाजपने चारपैकी दोन नगराध्यक्षपदे आ.परिणय
फुके यांच्या नेतृत्वात
जिंकली.
फडणवीस यांच्या नागपुरात मुसंडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिले. २७ पैकी २२ ठिकाणी कमळ फुलले.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल (शिंदेसेना) यांनी रामटेक, पारशिवनीत धनुष्यबाण आणले. काँग्रेस एकावर समाधान मानावे लागले. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या वर्धेत कमळ हरले.
प्रा. राम शिंदे यांची रोहित पवारांवर मात
राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपने १२ पैकी सात ठिकाणी विजय मिळविला.
जामखेडमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवार यांच्यावर मात केली. तेथे नगराध्यक्षपद आणि १५ जागा भाजपने जिंकल्या. लातूरमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले.
तटकरे, राणे यांना कोकणात धक्का
फलटणवर (जि.सातारा) वर्षानुवर्षे वर्चस्व असलेले शरद पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना दणका बसला. तिथे भाजप जिंकला. ईश्वरपूरमध्ये (जि.सांगली) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी एकहाती सत्ता मिळविली.
मंत्री नितेश राणे यांना कणकवलीच्या गडात धक्का बसला. तिथे सर्वपक्षीय आघाडीचे संदेश पारकर नगराध्यक्ष झाले. रायगडमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तिथे दहापैकी दोनच नगराध्यक्ष त्यांच्या पक्षाचे जिंकले.