VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:50 IST2025-08-05T20:49:40+5:302025-08-05T20:50:15+5:30
Maharashtra Local Body Elections: राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्याअखेरीस या निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केवळ ईव्हीएमचा वापर केला जाईल. व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यावेळी म्हणाले की, ४ महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा कार्यक्रम टप्प्याटप्याने घेण्यात येईल. नाशिकमध्ये ५० लाख ४५ हजार मतदार असून ४९८२ केंद्रे आहेत. सर्व निवडणूक एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची अडचण भासेल. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात निवडणूक घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोणत्या निवडणुका होतील हे अद्याप ठरले नाही असं त्यांनी सांगितले.