मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
By बाळकृष्ण परब | Updated: December 21, 2025 21:29 IST2025-12-21T21:06:32+5:302025-12-21T21:29:46+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगर परिषदेमध्ये तर पती-पत्नीच्या डझनभर जोड्या रिंगणात असल्याने त्यांना मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, निवडणुकीचा आज लागलेल्या निकालांमधून बदलापूरममध्ये निववडणूक लढवणाऱ्या जोडप्यांपैकी, चार जोडपी विजयी होऊन जोडीनं बदलापूर नगर परिषदेत पोहोचली.

मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी अनेक ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करून घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचं आणि एकाच घरात अनेकांना उमेदवारी दिल्याचं दिसून आलं होतं. त्यात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगर परिषदेमध्ये तर पती-पत्नीच्या डझनभर जोड्या रिंगणात असल्याने त्यांना मतदार कसा कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, निवडणुकीचा आज लागलेल्या निकालांमधून बदलापूरममध्ये निववडणूक लढवणाऱ्या जोडप्यांपैकी, चार जोडपी विजयी होऊन जोडीनं बदलापूर नगर परिषदेत पोहोचली. तर आणखी पाच जोडप्यांमधील दोघांपैकी एक जण विजयी झाला. विजयी झालेल्या पती-पत्नींमध्ये भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे आणि त्यांचे पती राजेंद्र घोरपडे यांचाही समावेश आहे.
बदलापूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर ही निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवारीमध्ये नेतेमंडळींच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या प्राधान्यामुळे चर्चेत आली होती. त्यात जवळपास आजी माजी नगरसेवकांसह सुमारे डझनभर जोडपी रिंगणात उतरल्याने इथल्या लढती लक्षवेधी ठरल्या होत्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक १ बी मधून शिवसेना शिंदे गटाचे नेते वामन म्हात्रे यांचे बंधू तुकाराम बारकू म्हात्रे हे विजयी. त्यांनी प्रभाकर पाटील यांचा पराभव केला. तर तुकाराम म्हात्रे यांच्या पत्नी उषा म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक ९ एमधून विजय मिळवला. त्यांनी आरती यादव यांचा पराभव केला.शिवसेना शिंदे गटाचे बदलापूरमधील प्रमुख नेते श्रीधर पाटील हे आणि त्यांच्या पत्नी स्वप्ना पाटील हे सुद्धा या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. श्रीधर पाटील हे प्रभाग क्रमांक ४ बीमधून विजयी झाले. त्यांनी भारती लिये यांचा पराभव केला. तर प्रभाग क्रमांक ४ ए मधून श्रीधर पाटील यांच्या पत्नी स्वप्ना पाटील ह्या विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या कविता तेली यांचा पराभव केला.
बदलापूरच्या नगराध्यक्षपदी विजयी झालेल्या भाजपाच्या रुचिता घोरपडे यासुद्धा त्यांच्या पतींसह नगर परिषदेत दाखल झाल्या आहेत. रुचिता घोरपडे यांचे पती राजेंद्र घोरपडे यांनी प्रभाग क्रमांक ७ बीमधून विजय मिळवला. त्यांनी संदीपा नवगिरे यांना पराभूत केले. तर नगराध्यक्षपदासोबत नगरसेवक पदाचीही निवडणूक लढवणाऱ्या रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी प्रभाग क्रमांक ३ ए मधूनही विजय मिळवला. तसेच भाजपाचे रमेश सोळसे आणि हर्षदा सोळसे हे पती-पत्नी देखील जोडीनं नगर परिषदेत पोहोचले. रमेश जनार्दन सोळसे यांनी प्रभाग क्रमांक २२ बी मधून विजय मिळवला. त्यांनी मंगेश गवळी यांचा पराभव केला. तर त्यांच्या पत्नी हर्षदा रमेश सोळसे प्रभाग क्रमांक २२ एमधून विजयी झाल्या. हर्षदा सोळसे यांनी निशा ठाकरे यांचा पराभव केला.
बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या या चार-पती पत्नींच्या जोडप्यांसोबत निवडणूक लढवणाऱ्या इतर जोडप्यांपैकी पती किंवा पत्नी असे दोघांपैकी एक विजयी होऊन नगर परिषदेत पोहोचला. त्यामध्ये भाजपाकडून शरद तेली आणि कविता तेली हे पती पत्नी रिंगणात होते. त्यांच्यापैकी शरद तेली हे प्रभाग क्रमांक ३ बी मधून विजयी झाले. मात्र त्यांच्या पत्नी कविता शरद तेली यांचा प्रभाग क्रमांक ४ ए मधून पराभव झाला. तर प्रभाग क्रमांक १२ एमधून भाजपाच्या संध्या सूरज मुठे विजयी झाल्या. तर प्रभाग क्रमांक १३ बी मधून सूरज उल्हास मुठे पराभूत झाले. तसेच प्रभाग क्रमांक १४ बीमधून भाजपाचे संभाजी ज्ञानोबा शिंदे विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक १६ एमधून त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे पराभूत झाल्या.
बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे अटीतटीच्या लढतीत प्रभाग क्रमांक १९ बी मधून विजयी झाले. मात्र त्यांच्या पत्नी वीणा म्हात्रे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्या. तसेच वामन म्हात्रे यांचे पुत्र वरुण म्हात्रे हेदेखील पराभूत झाले. तसेच प्रभाग क्रमांक १९ अ मधून शीतल प्रवीण राऊत बिनविरोध विजयी झाल्या होत्या. मात्र त्यांचे पती प्रवीण रामचंद्र राऊत यांना प्रभाग क्रमांक १७ ब मध्ये पराभव पत्करावा लागला. याबरोबरच शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या मुकुंद भोईर आणि जयश्री भोईर या पती-पत्नीपैकी दोघांचाही पराभव झाला. प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये जयश्री मुकुंद भोईर यांचा पराभव झाला. तसेच त्यांचे पती मुकुंद भोईर यांना प्रभाग क्रमांक २० ब मध्ये पराभवाचा धक्का बसला.