Mumbai: पावसात अडकलेल्या प्रवाशांकडून जादा भाडे घेतलेल्या कॅब चालकांना दणका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:48 IST2025-08-22T17:45:30+5:302025-08-22T17:48:08+5:30
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र परिवहन विभागाने मुंबई पोलिसांच्या मदतीने संबंधित कॅबचालकांवर कठोर कारवाई केली.

AI Image
मुसळधार पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत असताना, मुंबईतील काही ॲप-आधारित टॅक्सी चालकांनी जास्त भाडे आकारून प्रवाशांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र परिवहन विभागाने मुंबई पोलिसांच्या मदतीने या चालकांवर कठोर कारवाई केली.
प्राप्त तक्रारींनुसार, पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले. तपासणी केली असता, १४७ पैकी ३६ टॅक्सी चालकांनी हे भाडे २०० रुपयांवरून ६०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढवल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यानंतर, महाराष्ट्र परिवहन विभागाने मुंबई पोलिसांसोबत संयुक्त मोहीम राबवून दोषी टॅक्सी चालकांवर कठोर कारवाई केली.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर अखेर मुंबईकरांना दिलासा मिळाला. बुधवारपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले, ज्यामुळे रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या होत्या. बेस्ट उपक्रमाच्या बस सेवाही सामान्यपणे सुरू आहेत.