Maharashtra govt extends lockdown till 30 June: What's allowed and what's not list vrd | CoronaVirus: राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्ध

CoronaVirus: राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला अन् नियमावली केली प्रसिद्ध

मुंबईः केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनंही आपली नियमावली प्रसिद्ध केली आहे. ५ जूनपासून सगळे बाजार, बाजार परिसर, दुकानं सुरू होणार आहेत, पण मॉल्स आणि बाजार संकुलं याला अपवाद असतील. सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले जाणार आहेत. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे.

राज्यभर धार्मिक स्थळे आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार आहे. समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही मान्यता दिलेली आहे. ८ जूनपासून सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार १०% पर्यंत कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करू शकतील. 
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशी काम करणाऱ्या तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून काम करावे लागणार आहेत. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती न्यावे लागणार आहे. जेणेकरून तिथे जास्त गर्दी होणार नाही. सामूहिक (ग्रुप) हालचालींना परवानगी नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे आवश्यक करण्यात आले आहे. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. 

दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील. ट्रायल रूम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यांना होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी लागणार आहे. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे लागणार आहे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

8 जूनपासून तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे लागणार आहे. कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जावू शकतो. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वया भागातील कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडक बंद पाळण्यात येणार आहे. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहणार आहे. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळेतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra govt extends lockdown till 30 June: What's allowed and what's not list vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.