maharashtra election 2019 whole goa cabinet came to sawantwadi to defeat me says shiv sena leader deepak kesarkar | Maharashtra Election 2019: '...म्हणून माझ्या पराभवासाठी गोव्याचं पूर्ण मंत्रिमंडळ आलंय'
Maharashtra Election 2019: '...म्हणून माझ्या पराभवासाठी गोव्याचं पूर्ण मंत्रिमंडळ आलंय'

सावंतवाडी: गोव्यातील नेते सावंतवाडीत येऊन जो धुडगूस घालत आहेत. ते योग्य नाही. सिंधुदुर्गचे पर्यटन वाढले तर गोव्याचे काय? तसेच अनेक कंपन्या रोजगाराच्या दृष्टीने सावंतवाडी परिसरात येणार आहेत. या भितीपोटीच माझा पराभव करण्यासाठी गोव्याचे सर्व मंत्री सावंतवाडीत उतरले आहेत. असा आरोप महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंतवाडी मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी मला मदत करतील, असे आश्वासन दिल्याचेही सांगितले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजप पोकळे, डॉ.जयेंद्र परूळेकर, वसंत केसरकर, अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत चांगली व्यक्ती आहे. त्यांनी बंडखोर उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराला आलेल्या गोव्यातील भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांना ताबडतोब माघारी बोलावून घ्यायला पाहिजे होते. सावंतवाडी या सुसंस्कृत मतदारसंघात गोव्याचे लोक येऊन जनतेला आमिष दाखवत असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. जनता त्यांच्या अपवृत्तीला गाडून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशाराही यावेळी केसरकर यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढली तसेच येथे नवनवीन प्रकल्प आले तर गोव्याचे पर्यटन धोक्यात येईल या भितीपोटीच गोव्याचे मंत्री सावंतवाडीत आले आहेत. माझ्याशिवाय कोणीही पर्यटनात काम करू शकणार नाही. याची खात्री गोव्याला झाली आहे. त्यामुळे माझा पराभव करावा या उद्देशानेच आले आहेत. पण येथील जनता हे सहन करणार नाही. गोव्यातील मंत्री असो, अगर कोणीही असा सावंतवाडी मतदारसंघातील जनता जशास तसे उत्तर देईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

संस्कृत सावंतवाडी मतदारसंघात गोवा राज्यातील भाजपचे पदाधिकारी येऊन बंडखोर उमेदवार राजन तेली यांच्यासाठी जनतेला आमिषे दाखवत आहेत. हे योग्य नाही. सावंतवाडी व गोव्याचे नाते प्रेमाचे आहे, तुम्ही खुशाल या. पण प्रेमाने वागा. येथे मी शिवसेना-भाजप महायुतीचा उमेदवार असताना माझ्या विरोधातील बंडखोर उमेदवाराच्या प्रचारासाठी ते येतात, हे योग्य नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत याची दखल घेतील आणि त्यांच्या नेत्यांना माघारी बोलवतील, याची मला खात्री आहे.

सावंतवाडी शहर स्वच्छ व सुंदर आहे. मी या शहराच्या विकासासाठी व जनतेच्या शांततेसाठी प्रयत्नरत आहे. या शहराचे नेतृत्व मी करत होतो. माझे या शहराशी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते आहे. या शहरात अपप्रवृत्ती घुसू पाहत आहे. बबन साळगावकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपप्रवृत्ती, हप्ते गोळा करणारी वृत्ती घुसणार आहे.

'फडणवीस यांनी मला आश्वासन दिले होते'
सावंतवाडीत बंडखोर उमेदवार उभे आहेत. त्याचा भाजपशी काय संबध नाही, असे मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. तसेच आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे शिवसेना उमेदवाारांचे काम करतील, असेही स्पष्ट केले होते. मात्र तसे होताना दिसत नाही. याबद्दल मंत्री केसरकर यांनी खेद व्यक्त केला. मुख्यमंत्र्याचाही शब्द मानला जात नाही. तेली सारखे खोटरडे आहेत. असा आरोपही त्यांनी केला.

'काळसेकरांना मोदीचे असभ्य चित्र काढलेले चालतात'
माझ्यावर टीका करणाऱ्या काळसेकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असभ्य चित्र काढणारे राणे चालतात का? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे. असा सवाल उपस्थित करत तेली यांनी आपल्यावरील गुन्हे लपवून ठेवले असा आरोपही मंत्री केसरकर यांनी केला. मी गृहराज्यमंत्री असल्याने माझ्याकडे प्रत्येकाची माहिती आहे. पण त्याचा गैरफायदा घेतला नाही. माझी लढाई ही व्यक्तीगत नाही, प्रवृत्ती विरोधात आहे. असा खुलासाही यावेळी त्यांनी केला
 


Web Title: maharashtra election 2019 whole goa cabinet came to sawantwadi to defeat me says shiv sena leader deepak kesarkar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.