Maharashtra Election 2019: Submit a separate letter of support for the MLAs; Governor's Condition | महाराष्ट्र निवडणूक 2019: आमदारांच्या पाठिंब्याचे स्वतंत्र पत्र सादर करा; राज्यपालांची अट

महाराष्ट्र निवडणूक 2019: आमदारांच्या पाठिंब्याचे स्वतंत्र पत्र सादर करा; राज्यपालांची अट

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे, हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे, तसेच आमदारांच्या सह्या जबदस्तीने किंवा अन्य माध्यमांतून घेण्यात आलेल्या नाहीत, असे प्रमाणित करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची प्रतिस्वाक्षरी या पत्रांवर असावी, अशी अट राज्यपालांनी घातली आहे.

राज्यपालांच्या या अटीने पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या संयुक्त विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना विलंब होत आहे. या अटीनुसार आमदारांची वैयक्तिक स्वाक्षरी मिळविण्यासाठी नेते धावपळ करीत आहेत. मात्र पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी काही आमदारांनी आपल्या मागण्या पक्षनेतृत्वापुढे रेटल्या असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

आमदारांची ओळख परेड घेण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. मात्र त्याऐवजी आपापल्या पक्षांच्या प्रत्येक आमदाराच्या पाठिंब्याचे सहीनिशी पत्र सादर करण्यास या पक्षाच्या नेत्यांना सांगितले आहे. पूर्वीच्या काही राज्यपालांनीदेखील हीच पद्धत अवलंबिली असल्याने या पक्षांचा नाईलाज झाला आहे.

काँग्रेसचा पाठिंबा घेण्यास शिवसेनेच्या सहा आमदारांची इच्छा नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना या आमदारांची समजूत काढण्यासाठी धावपळ करावी लागली. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसमध्येही हीच स्थिती असून मंत्रिपदासाठी या दोन्ही पक्षांतील काही आमदार अडून बसले आहेत. शनिवारी दुपारपर्यंत नऊपेक्षा अधिक आमदारांच्या सह्या मिळाल्या नव्हत्या. आमदारांच्या सह्या शक्यतो लवकर घ्याव्यात, यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल महाराष्टÑातील नेत्यांच्या संपर्कात आहेत. आमदारांच्या पत्रांमुळे सत्तास्थापनेला विलंब होत असल्याचे समजते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019: Submit a separate letter of support for the MLAs; Governor's Condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.