Maharashtra Election 2019: Government in Maharashtra should be formed under the leadership of Devendra Fadnavis; says Nitin Gadkari | नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!
नितीन गडकरी 'इन अ‍ॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी काही केल्या फुटायला तयार नसताना, हा गुंता सोडवण्यासाठी वेगवेगळी नेतेमंडळी सक्रिय झाली आहेत. त्यात, देशात महामार्ग बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुढाकार विशेष लक्षवेधी मानला जातोय. त्याचं कारण, नितीन गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि 'मातोश्री'शी असलेले जवळचे संबंध. त्यामुळे ते भावांमधील भांडणातून 'मार्ग' काढू शकतात, भाजपा-शिवसेनेत 'पूल' बांधू शकतात, अशी आशा निर्माण झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि नितीन गडकरी आज कार्यक्रमात एकत्र भेटणार असल्यानं राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. गडकरी राज्याच्या राजकारणात परतणार का, शिवसेनेला सोबत घेऊन सरकारचं नेतृत्व करणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु, या शक्यता फेटाळून लावत, गडकरींनी तिढा लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त केला. त्यासोबतच, युती किंवा आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असतो, तेही शिवसेनेला समजावलं.

भाजपा आपल्या मदतीशिवाय बहुमताचा आकडा गाठू शकत नसल्याचं लक्षात आल्यानं शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्याबाबत आमचं ठरलंय, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारीमध्ये युतीच्या घोषणेवेळी सांगितलं होतं. त्या विधानाच्या आधारेच, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. परंतु, मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं काहीही ठरलं नव्हतं, असा दावा फडणवीस यांनी केला आहे आणि तेव्हापासून चर्चेला खीळ बसली आहे.

 

या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींनी भाजपाचं म्हणणं कसं योग्य आहे, हे पटवून दिलं. भाजपाचे १०५ आमदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात, भाजपा मुख्यमंत्रिपदावर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचंच त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि राज्याच्या हिताचा मार्ग लवकरच निघेल, असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा यायची इच्छा नाही. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनलं पाहिजे, असंही नितीन गडकरींनी ठामपणे सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ युतीच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थी करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक सुरु; मोबाईल फोनवर बंदी 

महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'

'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'

...तशी हिंमत कोणीही करणार नाही; राऊत यांचा भाजपावर निशाणा

सत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

Web Title: Maharashtra Election 2019: Government in Maharashtra should be formed under the leadership of Devendra Fadnavis; says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.