Maharashtra Election 2019: Only 3 days left for power; whats formula to form Government | सत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

सत्तास्थापनेसाठी उरले फक्त ३ दिवस; 'ही' आहेत सत्तेच्या गणिताची ९ समीकरणं 

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे. ९ नोव्हेंबर रोजी राज्याची विधानसभा बरखास्त होणार आहे त्यामुळे तत्पूर्वी नवीन सरकार स्थापन होणं गरजेचे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहे. भाजपाशिवाय सत्ता स्थापन करण्याच्या हालचालीही सुरु आहे. 

अशातच भाजपा शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहत आहे. शिवसेनेला सोडून भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही अशीही माहिती आहे. तर लवकरात लवकर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटून महायुतीनं सरकार स्थापन करावं असं विरोधकांचे म्हणणं आहे. त्यामुळे या सत्तासंघर्षात शिवसेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी या चारही प्रमुख पक्षांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 
या संत्तासंघर्षात सरकार बनविण्यासाठी ३ दिवस उरले आहेत त्यामुळे पुढील ९ समीकरणं सत्तेसाठी जुळून येणार का हे पाहणे गरजेचे आहे

१) भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा करु शकेल. त्यानंतर अन्य पक्ष, अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. भाजपाला बहुमताचा १४५ आकडा गाठण्यासाठी ४० आमदारांची गरज आहे. त्यामुळे अपक्षांसोबत भाजपा इतर पक्षातील आमदार फोडण्याचा प्रयत्न करु शकेल. त्यात शिवसेनेचे आमदार फोडण्याचा भाजपा विशेष प्रयत्न करेल. 

२) कोणत्याही पक्षाचं विभाजन होण्याची शक्यता कठिण आहे. असं झालं तर त्यांचे समर्थकांना उत्तरं देणं भाग पडतं. हरियाणात दुष्यंत चौटाला यांनी भाजपासोबत आघाडी केल्यानंतर जाट मतदारांची नाराजी त्यांना भोगावी लागली. 

३) जर कोणताही पक्ष सरकार बनविण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवू शकला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. अशा स्थितीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. दरम्यान भाजपा शिवसेना आणि अन्य पक्षाचे आमदार फोडण्याचा जोरदार प्रयत्न करेल

४) शिवसेना भाजपाशी चर्चा करु इच्छित असेल तर त्यांचे प्रयत्न दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करण्याचं असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी उद्धव ठाकरे बोलू शकतात. देवेंद्र फडणवीसांची चर्चा करण्यासाठी शिवसेना तयार नसल्याचं दिसून येत आहे. 

५) नितीन गडकरी यांना राज्यातील राजकारणाचा चांगला अनुभव आहे. गडकरींना संघाची साथही मिळत असते. त्यामुळे नितीन गडकरी पुन्हा राज्याच्या राजकारणाचा कितपत सक्रीय होणार यावर शंका आहे. तसेच ५ वर्ष अस्थिर सरकार चालविण्यासाठी नितीन गडकरी तयार नसतील असं सांगण्यात येतं.

६) भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला आगामी काळात डोईजड होऊ देईल का यावर प्रश्नचिन्ह आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि अन्य नेत्यांचे पक्षात वजन कमी झालं आहे त्यामुळे अन्य नेते तयार करण्याचं आव्हान भाजपासमोर आहे

७) या सर्व राजकारणात शरद पवार एकमेव नेते आहे जे सत्तेच्या केंद्राभोवती फिरत आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आहेत. ते सत्तेपासून दूर असले तरी त्यांचे संख्याबळ नवीन समीकरण बनविण्यासाठी महत्वाचं आहे. 

८) राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसची भूमिका सत्तासंघर्षासाठी महत्वाची आहे. काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे ४४ आमदार कोणाला पाठिंबा देणार की विरोधी बाकावर बसणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

९) २०१४ मध्ये भाजपाकडे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही पाऊलं दूर होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या जागा घटल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेलासोडून भाजपाला सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे भाजपा शिवसेनेच्या अटी मान्य करुन सत्ता बनविणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019: Only 3 days left for power; whats formula to form Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.