Maharashtra Election 2019: मतदानादिवशी सुट्टी नाहीए?, कर्मचाऱ्यांनो 'इथं' करा तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:51 IST2019-10-19T17:51:24+5:302019-10-19T17:51:52+5:30
२१ ऑक्टोबरला होणार मतदान; २४ ऑक्टोबरला निकाल

Maharashtra Election 2019: मतदानादिवशी सुट्टी नाहीए?, कर्मचाऱ्यांनो 'इथं' करा तक्रार
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थोड्याच वेळात संपणार आहे. यानंतर सोमवारी (२१ ऑक्टोबरला) राज्यात मतदान होईल. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी २१ ऑक्टोबरला सर्व दुकानं, आस्थापनं, निवासी हॉटेल, नाट्यगृहं, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालयं, मंडळं, महामंडळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी देण्यात आलेली सुट्टी भरपगारी स्वरुपाची असणार आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टी न देणाऱ्या कार्यालयांवर दंडाची कारवाई करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी कार्यालयानं सांगितलं आहे. यासंदर्भात शासनानं २५ सप्टेंबरला परिपत्रक काढलं होतं. एखाद्या अपवादात्मक स्थितीत जर कुठल्याही कंपनीला पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे गरजेचं असेल. परंतु कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलतदेखील मिळत नसेल तर त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येईल.
कर्मचाऱ्यांना प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयांमध्ये तक्रार नोंदवता येईल. तसंच राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे, मुंबईतदेखील तक्रार नोंदवता येईल अशी कामगार आयुक्तांनी त्यांच्या आदेशात दिली आहे.