मुंबई: राष्ट्रवादीच्या बैठकीतून तडकाफडकी निघालेले अजित पवार नाराज नसल्याचं पक्षाध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं आहे. मी बारामतीला जात असल्याचं म्हणत अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीतून अचानक बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. काँग्रेससोबतची बैठक रद्द झाली. ती पुन्हा कधी होणार नाही, हे माहीत नाही, असं म्हणत अजित पवार बैठक स्थळावरुन बाहेर पडले. मात्र अजित पवार नाराज नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. काँग्रेससोबतची बैठक रद्द झाली असून मी बारामतीला जात असल्याचं सांगत अजित पवार तडकाफडकी निघाले. याबद्दल शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. अजित पवार मुंबईतच आहेत. ते बारामतीला गेलेले नाहीत. उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला अजित पवार हजर राहतील. बारामतीबद्दलचं विधान त्यांनी चेष्टेनं केलं असेल. ठरवून ते असं म्हणाले असतील, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडे नाराजी व्यक्त केली. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाचा आदर करायला हवा. त्यासाठी काही पथ्यं पाळायला हवीत, अशा शब्दांत पवार यांनी वृत्तवाहिन्यांच्या वृत्तांकनाबद्दल नाराजीचा सूर लावला.आज संध्याकाळी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीतून तडकाफडकी निघाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्यासोबत गाडीत होते. काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर काँग्रेससोबत पुन्हा बैठक कधी होणार, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारला. या प्रश्नाला माहीत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. मी बारामतीला जात असल्याचं सांगत अजित पवार बैठक स्थळाहून निघून गेले.राष्ट्रवादीच्या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघून गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटीलदेखील गाडीत होते. पवार आणि पाटील बैठक स्थळावरुन निघाल्यानंतर तटकरेदेखील बाहेर पडले. मात्र मी बैठकीला उशिरा पोहोचल्यानं अजित पवार अचानक का निघून गेले, याबद्दल मला कल्पना नसल्याचं तटकरे म्हणाले. पुढील आठवड्यापासून लोकसभेचं अधिवेशन होणार आहेत. त्यात राज्यात लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीवर चर्चा अपेक्षित आहे. त्याच पार्श्वभूमीवर मार्गदर्शन घेण्यासाठी मी शरद पवारांना भेटायला आलो होतो, असं तटकरेंनी सांगितलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टा केली असेल; शरद पवारांनी फेटाळलं नाराजीचं वृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 20:45 IST