एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:24 IST2025-08-06T14:22:52+5:302025-08-06T14:24:30+5:30
Deputy CM Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
Deputy CM Eknath Shinde News: राज्यात एकीकडे ठाकरे बंधूंची युती, महाविकास आघाडीचे भवितव्य आणि महायुतीवर होणारे परिणाम यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकाचवेळी दिल्लीत जात आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे समजते. या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण
विधानसभा निवडणूक झाल्यापासून ठाकरे गटाला लागलेली गळती अद्यापही थांबताना दिसत नाही. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक, शेकडो पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात आले आहेत. परंतु, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवरून शिंदे गटात येण्याचा ओघ कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यात या घडामोडी असताना एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक
दिल्ली दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक्सवर एक पोस्ट करून कौतुकोद्गार काढले आहेत. अभिनंदन! भारताच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे अमित शाह हे देशाचे पहिले गृहमंत्री ठरले आहात. याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री तर आहातच. पण सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे आपण कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते आहात. देश हितासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी आपणांस शुभेच्छा, असे एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावावर खास विक्रम नोंदवण्यात आला आहे. सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रीपद भूषवण्याचा मान अमित शाह यांना मिळाला आहे. या बाबतीत अमित शाह यांनी माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना मागे टाकले आहे. अमित शाह हे २ हजार २५८ दिवस भारताचे गृहमंत्री राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी ३० मे २०१९ रोजी पहिल्यांदाच गृहमंत्री पद स्वीकारले. त्यानंतर २०२४ मध्ये एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतरही गृहमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याच खांद्यावरच सोपवण्यात आली. माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत २ हजार २५६ दिवस गृहमंत्रीपद भुषवले. तर, सरदार वल्लभभाई पटेल हे १ हजार २१८ दिवस देशाचे गृहमंत्री राहिले.
अभिनंदन !
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2025
भारताच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे मा.ना.श्री.@AmitShah जी साहेब देशाचे पहिले गृहमंत्री ठरले आहात. याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.
३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा…