Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 19:53 IST2025-05-11T19:52:28+5:302025-05-11T19:53:40+5:30
Eknath Shinde on india pakistan Tensions: युद्धविरामाच्या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानला महत्त्वाचा इशारा दिला.

Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र, तरीही पाकिस्तान कुरापती करू शकतो, असे बोलले जात आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागले पाहिजे नाही तर त्यांचे नाव जगाच्या नकाशावरून कायमचे गायब करण्याची भारतामध्ये क्षमत आहे, असे शिंदे म्हणाले.
मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत बोलताना पाकिस्तानला महत्त्वाचा इशारा दिला. 'पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करुन सुरुवात केली. त्यांना आपण उत्तर दिले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र, तरीही पाकिस्तानने बेईमानी केली. पाकिस्तानने अनेकदा युद्धविरामाचे उल्लंघन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आणखी एक संधी दिली. पण तरीही पाकिस्तानने आपल्या नागरिकांवर हल्ला केला. यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तान पुन्हा हल्ला करेल, असे भारतीय लष्कराला वाटले. त्यामुळे मोदींनी युद्धविरामाची कुठलीही पोस्ट केली नाही. पाकिस्तान वारंवार अशा गोष्टी करणार असेल तर, त्यांना धडा शिकवला जाईल', असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पण असे आहे की, कुत्र्याची शेपूट वाकडंच राहते. पाकिस्तानची प्रवृत्ती अशीच आहे. कुत्र्याचे शूपट वाकडे असल्यामुळे ते कापले जाते. गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हेच करतील. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागले पाहिजे. नाही तर पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून गायब करण्याची क्षमता भारतामध्ये आहे.'
जम्मू- काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला केला.