शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

Maharashtra Day: वारली संस्कृती सातासमुद्रापार नेणारे जिव्या

By अोंकार करंबेळकर | Published: May 01, 2018 8:30 AM

जिव्या सोमा मशे आठ-दहा किलोमीटर जवळच्या गंजाड गावात राहतात एवढं माहिती होतं म्हणून तिकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षामध्ये बसलो. डहाणू-जव्हार रस्त्यावर डहाणूची घरं वेगाने मागे जाऊ लागली. थोड्याचवेळात गंजाडला जाऊन पोहोचलो.

वारली चित्रशैलीतील गेरुसारख्या तांबड्या रंगावर काढलेली पांढऱ्या आकृत्यांची चित्रे आता शहरांमध्ये सगळीकडे दिसतात. कागदावर, घरांच्या भिंतींवर, कपड्यांवर, चहाच्या कपावर असे अनेक कॅनव्हास वारली चित्रांनी व्यापले आहेत. परदेशातसुद्धा या चित्रांना विशेष मागणी असते. याच वारली चित्रांबरोबर एक नाव जोडलेले आहे ते म्हणजे जिव्या सोमा मशे यांचे. इंटरनेटवर यांचं वारली चित्रांबरोबर नाव जोडले की त्यांच्याबद्दल भरपूर माहिती मिळते, त्यांचे पुरस्कार, फोटो पाहायला मिळतात. पण आजच्या जगाला वारली चित्रांची ओळख करून देणारा हा माणूस डहाणूजवळ राहतो एवढेच माहिती होते. त्यामुळे त्यांना एकदा भेटायला जायला हवं असं सारखं मनात येई, शेवटी यावर्षी त्यांच्या भेटीचा योग आला.

डहाणू स्टेशनला उतरलो तेच प्रवाशांचं स्वागत करणारी वारली चित्रे पाहत. डहाणू, तलासरी हा गुजरात आणि दादरा नगर हवेलीला चिकटलेला सगळा पट्टा आदिवासींचा आहे. बोर्डी, घोलवड, डहाणूचे चिकूही प्रसिद्ध आहेत. डहाणूला उतरताच मराठी, गुजराती आणि स्थानिक आदिवासींची भाषा या तिन्हींचे मिश्रण होऊन तयार झालेली एक वेगळीच भाषा कानावर पडू लागली. या सगळ्या आदिवासी पट्ट्यात डहाणूच काय ते मोठं शहरवजा गाव आहे. हॉटेलं, कपड्यांची दुकाने, बॅंकांची संख्या वाढत आता या गावाचा तोंडवळा बदलू लागलाय.

जिव्या सोमा मशे आठ-दहा किलोमीटर जवळच्या गंजाड गावात राहतात एवढं माहिती होतं म्हणून तिकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षामध्ये बसलो. डहाणू-जव्हार रस्त्यावर डहाणूची घरं वेगाने मागे जाऊ लागली. थोड्याचवेळात गंजाडला जाऊन पोहोचलो. आदल्या दिवशीच येथे बाजार होऊन गेला होता. त्यामुळे काही दुकाने अजूनही तेथेच होती. कपड्यांची, भाज्यांची दुकाने रस्त्यावर अजून सुरु होती. एकदोन चहा-भजीची हॉटेलंही सुरु होती. आजूबाजूच्या बारा पाड्यांचे मिळून गंजाडमध्ये गटग्रामपंचायत स्थापन केली आहे. या गंजाड ग्रामपंचायतीजवळच मशेंचं घर आहे असं डहाणूत समजलं होतं, म्हणून ग्रामपंचायतीकडे जायला निघालो.

 जिव्या मशे जागतिक दर्जाचे चित्रकार असल्यामुळे त्यांचं घर चटकन सापडलं. पण त्या घरात कोणीच नव्हतं. मशेंची दोन घरे आहेत आणि नेमके आदल्या दिवशीच शेजारच्या कळंबीपाड्यातल्या घरात मशे राहायला गेले होते. कळंबीपाडा नक्की किती लांब आहे ते कळत नव्हतं. खरं तर शेजारी असलेला हा पाडा गंजाडच्या लोकांच्या मानाने एकदम जवळ होता पण म्हटलं आपण रिक्षानेच जाऊ. जव्हार रस्त्यावर परत आल्यावर केतन तुंबरा नावाचा तरुण रिक्षावाला मशेंच्या घरी यायला तयार झाला. पंचविशीतला केतन चांगलाच बडबड्या निघाला. आजूबाजूची भरपूर माहिती तो सांगत होता. मूळचे तलासरी तालुक्यातले मशे खूप वर्षांपुर्वी कळंबीपाड्याला स्थायिक झाले. कळंबीपाड्याला मशे यांच्या मुलांनी आता दोन पक्की घरं बांधली आहेत. त्याच्याजवळच मशेंची मूळ जुनी झोपडी आहे. कुडाच्या आणि सारवलेल्या भिंती आणि कौलारु छप्पर असलेली ही झोपडी आज मशे लोक भात साठवायला वापरतात. मशे आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहात होते. 

केतनचं बोलणं ऐकत पुढे गेलो तर फक्त लंगोट लावलेले स्वतः मशे खुर्चीत बसून कोयत्याने आंबा कापून खात बसले होते. फोटोतले मशे आणि हे यांच्यामध्ये भरपूर फरक जाणवला. मशे चांगलेच थकले आहेत. आम्ही आलो म्हटल्यावर घरातली सगळी मंडळी बाहेर आली. जिव्या मशेंचा धाकटा मुलगा बाळूही त्यात होते. मशेंना आणि तुम्हाला भेटायला आलो म्हटल्यावर सगळ्यांनी स्वागत केलं. मशेंना आता फारच कमी ऐकायला येतं, त्यामुळे मोठ्याने बोलायला लागत होतं. पण आमचं काहीच त्यांना समजत नव्हतं. त्यांना त्यांच्या वारली लोकांच्या भाषेची सवय होती. घरातले लोक त्यांना आमचं म्हणणं मोठ्याने ओरडून समजावत होते. थोडंफार बोलणं झाल्यावर बाळू यांच्याबरोबर आम्ही आत गेलो. सगळ्या घराच्या भिंती चित्रांनी आणि पुरस्कारांनी भरलेल्या होत्या.

मशे यांना 2011 साली मिळालेली पद्मश्री पदवीही त्यांनी दाखवली. एका बाजूला कोपऱ्यात वारली चित्रांमधले सर्वात प्रसिद्ध असणारे वारली गावाचे चित्र होते. असे चित्र वारली लग्नांमध्ये सजावटीसाठी वापरतात. या चित्रामुळेच मशे सगळ्या जगाच्या समोर आले. मशेंची चित्रकला सर्वात आधी कशी प्रसिद्ध झाली विचारल्यावर बाळू म्हणाले, "आमच्या वारली लोकांमध्ये लग्नामध्ये बामण नसतो. ठराविक सवाष्ण बायका लग्न लावतात. त्या बायका लग्नघरात सगळी विवाहाच्या साहित्याची मांडामांड करतात. त्यात ही चित्रेही असतात.

लग्न म्हटलं की हे चित्र काढावंच लागतं. असेच एकदा या सवाष्ण बायकांबरोबर चित्र काढायला जिव्या मशे गेले होते. त्यावेळेस मालाडच्या एका डेकोरेटरने त्यांची चित्रकला पाहिली. हा मुलगा वेगान ही सुंदर चित्रे काढतो हे पाहिल्यावर त्याने मशेंना आणखी चित्रे काढायला सांगितली. त्या दिवसानंतर मशेंना लग्नात डेकोरेशनसाठी चित्रे काढायला भरपूर बोलावणी यायला लागली." चित्रकलेचे काम सुरु करण्याआधी जिव्या एका सावकाराकडे महिना 60 रुपयांवर काम करत असत.

तारपा नृत्याचे ते प्रसिद्ध चित्र बाळू समजावून द्यायला लागले. दुधी भोपळ्यापासून आम्ही तारपा तयार करतो असे सांगत त्यांनी वाळवायला ठेवलेले दोन दुधी दाखवले. चित्रामध्ये एका बाजूला तारपा नृत्य होते. या चित्रात मध्यभागी असते ती वारलींची पालगुड देवी. लग्नात मदत करणाऱ्या सवाष्ण बायका, करवलीही त्यात असते. वाघ, मासे, मासेमारी करायची जाळी, झाडं असं वारलींच्या नेहमी आजूबाजूला असलेल्या गोष्टी त्यात चितारलेल्या होत्या. मशेंचं एक मासेमारीचं चित्रही चांगलंच प्रसिद्ध झालं , ते सुद्धा पाहायला मिळालं. आजकाल शहरात वारली चित्रे रंगाने कागदावर काढली जात असली तरी मशे आणि त्यांची मुलं, नातवंडं तांदळाच्या पिठाने आणि ब्रशऐवजी काडीने चित्रं काढतात. बाळू सध्या वारुळाचं एक सुंदर चित्र काढत आहेत. म्हटलं जिव्या अजूनही चित्र काढतात का? तर ते म्हणाले, "नाही! आता फारसं नाही जमत त्यांना! हात थरथरतात त्यांचे. तरिही त्यांच्या डोक्यात ही सगळी चित्र आहेत. चित्रांच्या कल्पना डोक्यात येत असतात. आज सकाळीच मला कागद आणि पिठ कालवलेला डबा दे म्हणत होते. "

 म्हटलं आता काढतील का काही ते. बाळूंनी मशेंच्या हातामध्ये वारुळाचं चित्र, रंगाची डबी आणि काडी देताच त्यांनी चित्र पूर्ण करायला घेतलं. थरथरत्या डाव्या हाताने ते मुंग्यांची रांग काढू लागले. त्यांना चित्र काढताना पाहणं खरंच भारी वाटत होतं. 

बाळू म्हणाले, 1976 साली यांना पहिल्यांदा दिल्लीला जायचं होतं. तेव्हा हे आतासारखे फक्त लंगोट लावून निघाले होते. प्रवासाला जाण्यासाठीही त्यांच्याकडे कपडे नव्हते. शेवटी गावातल्या एका माणसाने त्यांना पॅंट दिली, मग ते दिल्लीला गेले. आज मशेंचं कुटुंब वारली चित्रांसाठीच काम करतं. सदाशिव आणि बाळू ही हे त्यांचे दोन्ही मुलगे आणि नातवंडं चित्र काढतात, शिकवायलाही जातात. जिव्या मशेंची चित्र फ्रान्स आणि जर्मनीमध्येही प्रसिद्ध गॅलरीमध्ये झळकली आहेत. बाळूही चित्रांच्या प्रदर्शनासाठी आणि शिकवण्यासाठी जपान, जर्मनी, ब्राझीलला जाऊन आले आहेत. चित्र आणि फोटो पाहिल्यानंतर आता रोप घेऊन आमची निघायची वेळ झाली होती. 

पुन्हा मुख्य रस्त्यावर सोडायला केतन होताच. इतका वेळ तो मसेंच्या घरामध्ये एकदम मोकळेपणाने वावरत होता. अधूनमधून आम्हाला माहिती देत होता, कधी मशे कुटुंबाला त्यांच्या भाषेत आमचं बोलणं समजावून सांगायचा. त्याला थॅंक्यू म्हटल्यावर तो पुन्हा बटण दाबल्यासारखा बोलायला लागला. रिक्षात वारली लोकांचे रिवाज, रितींबद्दल माहिती सांगत होता. आम्हा वारली लोकांमध्ये फारच लवकर लग्न करुन देतात. माझंही तसंच झालंय. लग्न लवकर मग मुलेही लवकर. मी म्हटलं तुला किती मुलं आहेत? तर म्हणाला, आताच बायकोचे चौथे बाळंतपण झालंय. जेमतेप पंचविशी-तिशीतल्या मुलाला चार मुले असल्याचं ऐकून धक्काच बसला. पुढे म्हणाला, आमच्याकडची सगळी लहानसहान पोरंही तंबाखू, गुटखा खातात. रोज रात्री जांभळाची दारु लागतेच. केतन वारली लोकांच्या सध्यस्थितीबद्दल धक्क्यांमागे धक्के देत सुटला होता. डहाणू तालुक्यात बऱ्याचठिकाणी सामाजिक संस्था काम करतात, आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळाही स्थापन केलेल्या आहेत. पण वारली लोकांची स्थिती फारशी बदललेली नाही. आजही एक टॉवेलवजा  गुंडाळलेले कापड आणि वरतीही तसेच आखूड वस्त्र अशाच कपड्यांत तिथल्या महिला होत्या.

डहाणू-जव्हार रस्ता सोडला तर फारसं काहीच बदललेलं नाही. जमलं तर तंबाखू- दारु सोडता येतं का पाहा असं सांगून डहाणूच्या रिक्षात बसलो. सकाळी डहाणू स्टेशनवर पाहिलेली चित्र पुन्हा निरखून पाहिली. मशेंच्या घरी जाऊन आल्यामुळे आता त्यातले बरेच प्राणी, झाडं, लोक ओळखता येत होते. डहाणूच्या आसपासच्या तरुणांनी ही चित्र काढली आहेत. एके ठिकाणी जिव्या मशेंचा नातू प्रवीणचेही नाव दिसले. ही चित्रे पाहून डहाणूचा निरोप घेतला. दुकानांचा झगमगाट आणि थोडीशी गर्दी यामुळे डहाणू थोडं शहरासारखं होऊन एक बेट झालंय पण चारही बाजूंनी गरिबीच्या समुद्राने त्याला वेढलंय असं गंजाडच्या भेटीने वाटायला लागलं

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी