Join us  

दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 4:10 AM

मुंबईकरांचे महाराष्ट्रदिनी हाल

मुंबई : अवघ्या दोन दिवसांत बुधवारी सायंकाळी दुसऱ्यांदा हार्बर मार्गावरील लाेकल रुळावरून चाचणीदरम्यान घसरल्याची घटना घडली. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंतची बंद पडलेली वाहतूक पूर्ववत होण्यास रात्र झाली होती. तर ऐन गर्दीच्या वेळी हार्बर कोलमडल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मशीद बंदर रेल्वे स्थानकालगत हार्बर मार्गावर लोकल घसरली होती. त्यामुळे तीन तासांहून अधिक काळ हार्बर सेवा ठप्प होती. याच मार्गावर बुधवारी चाचणी सुरू असतानाच सायंकाळी ५ च्या सुमारास लोकल रुळावरून घसरल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली. सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत लोकल सेवा बंद पडल्याने प्रवाशांना मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. शिवाय हार्बर मार्गावर गोरेगाव ते वांद्रेदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दादर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.

हार्बर लाइनवर सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल उशिराने सुरू झाल्या तरी भायखळा, वडाळा, परळ आणि कुर्ला स्थानके प्रवाशांनी खच्चून भरली होती.

चाचणीच्या वेळी रिकाम्या लोकलची दोन चाके घसरली होती. सायंकाळपर्यंत सेवा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या नाहीत. मात्र, लोकल विलंबाने धावत होत्या.

- डॉ. स्वप्निल नीला,

मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

...या स्थानकांवर गर्दी

१ मेच्या सुटीमुळे दैनंदिन प्रवाशांची लोकलला गर्दी नव्हती, मात्र सुट्टीमुळे कुटुंबासह घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा भरणा मोठा होता. पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी ते बाहेर पडल्याने त्यांना

मोठा फटका बसला. दुसरीकडे

भायखळा, दादर, कुर्ल्यासारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला.

टॅग्स :रेल्वेमुंबई