Maharashtra Politics: काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधींनीच घ्यावी; पक्षाच्या प्रदेश बैठकीत एकमताने ठराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 18:53 IST2022-09-19T18:52:37+5:302022-09-19T18:53:40+5:30
Maharashtra News: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Maharashtra Politics: काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधींनीच घ्यावी; पक्षाच्या प्रदेश बैठकीत एकमताने ठराव
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी (AICC Delegate) यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व सर्व प्रदेश प्रतिनिधींनी हा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच सदर बैठकीत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी विनंती करणारा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले, हा ठरावही सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला.
प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीला प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, मधुकर चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, AICC चे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, संपतकुमार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, APRO दिनेशकुमार, नरेश रावत, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह सर्व प्रदेश प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केले.
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन
काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुक प्रक्रिया कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यांने व्यवस्थित पार पडला असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे असे प्रदेश निवडणूक अधिकारी व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी सांगितले. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रा सुरु केली आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहनही पल्लम राजू यांनी यावेळी केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर सुरु असलेली भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहे, या यात्रेच्या तयारीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.