"प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"; राष्ट्रवादीचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 07:03 PM2022-08-09T19:03:30+5:302022-08-09T19:04:00+5:30

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet Expansion NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis Government Ministers | "प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"; राष्ट्रवादीचा टोला

"प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"; राष्ट्रवादीचा टोला

googlenewsNext

Jayant Patil on Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर मार्गी लागला. आज सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशी एकूण १८ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पावसाळी अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. भाजपा आणि शिंदे गटातील अनेक आमदारांना अपेक्षा असूनही मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं. आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करू आणि जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला, त्यांनाच बरोबर घेऊन जाणं हे सोपं काम नाही. आज पुन्हा एकदा भाजपाने ते करुन दाखवलं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हा त्यांचा चॉईस असतो मात्र बघणार्‍यांना ते मंत्रीमंडळ कसं दिसतं हा जनतेचा चॉईस आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहकारी निवडून आपली कामगिरी बजावली आहे, आता जे सहकारी आहेत त्यांच्यात काय-काय अभाव आहे. कोणत्या प्रकारचे, कोणत्या पध्दतीचे, कोण बाहेर राहिले आणि कुणाच्या प्रचंड अपेक्षा असताना भ्रमनिरास झाला आहे याच्या कहाण्या येत्या आठ-दहा दिवसात समोर येतील", असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आज झालेल्या विस्तारात भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली. तर शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, दीपक केसरकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ३९ दिवसानंतर मंत्रीमंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे आता जनतेच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: Maharashtra Cabinet Expansion NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis Government Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.