"कर्ज काढून ठेकेदारांवर उधळपट्टी सुरु असल्याने राज्यावर आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर", नाना पटोले यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 19:47 IST2025-03-10T19:46:35+5:302025-03-10T19:47:05+5:30
Nana Patole News: महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

"कर्ज काढून ठेकेदारांवर उधळपट्टी सुरु असल्याने राज्यावर आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर", नाना पटोले यांचा गंभीर आरोप
मुंबई - महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातूनच समोर आले होते. आज अर्थसंकल्पातून सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. महसूली तूट आणि राजकोषीय तूट वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा पूर्ण होणार की नाही या बाबत साशंकताच आहे. प्रसिद्धीसाठी फक्त घोषणा केल्या जात आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारप्रमाणे २०४५ मध्ये महाराष्ट्र विकसित होईल, २०३० पर्यंत सर्वांना घर मिळेल अशा पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत. पण विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासनांपैकी एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही.
लाडक्या बहिणींना २१०० रु., शेतक-यांची कर्जमाफी या घोषणा होतील अशी जनतेची अपेक्षा होती. ही आश्वासने देऊन महायुतीने जनतेची मते मिळवली होती. पण आज त्यांची फसवणूकच सरकारने केली. महागाई, बेरोजगारी या अत्यंत महत्वाच्या विषयांवर अर्थसंकल्पात काही निती, ठोस कृती कार्यक्रम नाही. त्यामुळे सरकार या प्रश्नांवर गंभीर आहे असे दिसत नाही. मुंबई, ठाणे आणि पुणे याच्यापलिकडच्या महाराष्ट्रासाठी मराठवाडा विदर्भातल्या ग्रामीण भागासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. राज्याच्या भविष्यासाठी जनतेच्या हितासाठी काही ठोस घोषणा कोणताही रोडमॅप नसलेला हा दिशाहीन अर्थसंकल्प आहे असे पटोले म्हणाले.