रोहित पवार शरद पवार गटात नाराज?; "७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतरही काही नेत्यांना..."

By प्रविण मरगळे | Updated: March 3, 2025 14:31 IST2025-03-03T14:30:21+5:302025-03-03T14:31:01+5:30

महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असं बोलायला हरकत नाही असं सांगत रोहित पवारांनी पक्षातील नाराजीच्या प्रश्नावर पत्रकारांना थेट उत्तर देणं टाळलं. 

Maharashtra Budget Session 2025 - Rohit Pawar indirectly comments on displeasure among Sharad Pawar's NCP | रोहित पवार शरद पवार गटात नाराज?; "७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतरही काही नेत्यांना..."

रोहित पवार शरद पवार गटात नाराज?; "७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतरही काही नेत्यांना..."

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटातील नेते आणि आमदार रोहित पवार त्यांच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. अलीकडेच छावा सिनेमाच्या बाबतीत रोहित पवारांनी केलेले ट्विट चर्चेत आले. त्यात रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत जवळच्या माणसांकडून सावध राहण्याची गरज असते, त्याचा धडा यातून मिळाला असं ट्विट केले. रोहित पवारांच्या या ट्विटने त्यांचा रोख कुणाकडे असा सवाल उपस्थित झाला. त्यानंतर आज अधिवेशनासाठी आलेल्या रोहित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर ऐकून ते पक्षात नाराज आहेत का अशीच चर्चा सुरू झाली आहे.

रोहित पवार म्हणाले की, गेली ७ वर्ष पक्षासाठी लढल्यानंतर कुठेतरी आम्ही कमी पडत असल्याचं काही नेत्यांना वाटत असल्याने कदाचित त्यांनी निर्णय घेतला असेल. एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय किंवा नसला काय सामान्य लोकांच्या हितासाठी आजपर्यंत मी लढत आलो आहे. पक्षाचा पाठिंबा कायम राहिला असून विशेषत: शरद पवारांचा पाठिंबा माझ्यासारख्याला आणि इतरही कार्यकर्त्याला राहिलेला आहे. तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी व्यक्तिगत टिप्पणी करणार नाही, परंतु मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे. विरोधी पक्षावरही जनता नाराज आहे. सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही म्हणून नाराज आहे आणि विरोधी पक्ष लोकांचा आवाज बनून सरकारविरोधात लढत नाही म्हणून जनता नाराज आहे. मी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना विनंती करतोय, अनेक अनुभवी नेते, मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत. परंतु आज लोकांच्या बाजूने बोलताना खूप कमी नेते दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असं बोलायला हरकत नाही असं सांगत रोहित पवारांनी पक्षातील नाराजीच्या प्रश्नावर पत्रकारांना थेट उत्तर देणं टाळलं. 

रोहित पवारांना जबाबदारी न मिळाल्याने नाराजी?

अलीकडेच राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात अनेक नेत्यांना पदांची आणि नवी जबाबदारी देण्यात आली. मात्र त्यात रोहित पवार दिसले नाहीत असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर मी आजारी असल्याने त्या बैठकीला मला जाता आला नाही. त्या बैठकीत काय चर्चा झाली हे सांगता येणार नाही. मात्र अजूनपर्यंत कुठलीही जबाबदारी माझ्यापर्यंत आली नाही किंवा मला जबाबदारी दिल्याचे कळाले नाही. जबाबदारी दिली नाही म्हणून नाराज आहे असा विषय नाही. खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहे. लढलं पाहिजे. ७ वर्ष पक्षासाठी लढत असताना कुठेतरी आम्ही कमी पडत असू असं काही नेत्यांना वाटत असेल अशी नाराजी रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. 

रोहित पवारांचं ट्विट काय?

छावा सिनेमा पाहिल्यानंतर रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो असं म्हटलं होते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होते. 

Web Title: Maharashtra Budget Session 2025 - Rohit Pawar indirectly comments on displeasure among Sharad Pawar's NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.