कांदळवनातील रोहिंग्यांनी रॉकेट लॉंचर डागले तर काय करणार? भाजपचे प्रसाद लाड यांचा सरकारलाच सवाल
By योगेश पांडे | Updated: December 14, 2025 11:51 IST2025-12-14T11:51:09+5:302025-12-14T11:51:36+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या भागात भू-माफियांकडून रोहिंग्यांना बेकायदेशीर घरे विकली जात आहे. त्यातील काहींनी जर सरकारी आस्थापनांवर रॉकेट लॉंचर डागले किंवा बॉम्ब फेकला तर कोण जबाबदार राहणार असा सवाल प्रसाद लाड यांनी केला.

कांदळवनातील रोहिंग्यांनी रॉकेट लॉंचर डागले तर काय करणार? भाजपचे प्रसाद लाड यांचा सरकारलाच सवाल
- योगेश पांडे
नागपूर - मुंबईतील शांतीनगर येथील कांदळवनातील जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत भाजपचे प्रसाद लाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या भागात भू-माफियांकडून रोहिंग्यांना बेकायदेशीर घरे विकली जात आहे. त्यातील काहींनी जर सरकारी आस्थापनांवर रॉकेट लॉंचर डागले किंवा बॉम्ब फेकला तर कोण जबाबदार राहणार असा सवाल केला. दोन दिवसांत तेथील अतिक्रमण हटविणार असल्याची घोषणा राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली.
या भागात मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण सुरू आहे. तेथे जवळच ओएनजीसी, आरसीएफ सारखे प्रकल्प आहेत. मुंबईचा बांगलादेश झालेला सहन करणार नाही. सरकारने तेथील झोपडपट्टी हटवावी व घुसखोरांना हाकलावे अशी मागणी लाड यांनी केली. यावर बोलताना योगेश कदम यांनी १५ व १६ डिसेंबर रोजी तेथील अतिक्रमण हटविण्यात येईल अशी घोषणा केली. २०१२ साली कांदळवनात हे प्रकार सुरू झाले. तेथे वनविभागाचे कर्मचारी गस्त घालतात. मात्र वनविभाग व गृहविभागाने आजवर एकदाही संयुक्त कारवाई केलेली नाही. अतिक्रमण केलेल्या जागेवर अनधिकृत घरे बांधून ती रोहिंग्यांना विकल्याचे दावे होत आहे. कांदळवनाचे गुगल मॅपिंग करणे आवश्यक आहे व आठ महिन्यांत ते काम पूर्ण करणार. तसेच या भागातील अतिक्रमण हटविण्यात येत असताना तेथे रोहिंग्या व इतर घुसखोरांना शोधण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.