नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:04 IST2025-12-08T14:04:25+5:302025-12-08T14:04:57+5:30
Maharashtra assembly winter session 2025: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यास सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवण्यात आला असून, आज ८ डिसेंबर रोजी सुरू झालेलं हे अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार आहे.

नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यास सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवण्यात आला असून, आज ८ डिसेंबर रोजी सुरू झालेलं हे अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार आहे. दरम्यान, विदर्भाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून आयोजिक केल्या जाणाऱ्या या अधिवेशनाचा कालावधी अगदीच कमी असल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज कामकाजाला सुरुवात झाल्यावर केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या मर्यादित कालावधीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचं असल्याने ते विदर्भ करारानुसार व्हायला हवं, असा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार, हे ठीक आहे. पण तुम्ही असा संदेश पाठवला की, आम्ही तिथे या गोष्टींना परवानगी दिली होती. आम्ही तिथे आमचं मत मांडलं होतं. ८ डिसेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत अधिवेशन व्हावं, असा आग्रह आम्ही केला होता. अधिवेशनाचा कालावधी एखादा आठवडा अधिक वाढवा, असा आग्रह आम्ही केला. निर्णय झाला हे ठीक आहे, पण तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नका, असे भास्कर जाधव म्हणाले.
तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राचं एकत्रिकरण करण्यात आल्यानंतर किमान दोन महिने हे अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं, असं निश्चित झालं होतं. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना एक महिना अधिवेशन चालायचं. ठीक आहे. पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई का आहे, असा सवाल नाना पटोले यांनी विचारला.
त्यानंतर नाना पटोले आणि भास्कर जाधवांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी केलेल्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाना पटोले हे आधी पीठासीन अधिकारी होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण पुरवणी मागण्या सादर करतो, जी विधेयकं पारित करायची आहेत, त्याची ओळख पहिल्या दिवशी करून दिली जाते. तसेच अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे. गेल्या २५-५० वर्षांतील अधिवेशनांच्या पहिल्या दिवसाची माहिती काढली, तर यापेक्षा वेगळा अजेंडा तुम्हाला दिसणार नाही. अधिवेशन जास्तीत जास्त कालावधीपर्यंत चाललं पाहिजे, ही आमचीसुद्धा भावना आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये नागपूरमध्ये सर्वाधिक काळ अधिवेशन हे मी मुख्यमंत्री असतानाच चाललं आहे. पुढेही चालेल. मात्र आता आचारसंहिता सुरू आहे. पुढे कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पहिला आठवडा आणि आणखी दोन दिवस एवढं अधिवेशन चालवण्याचं आपण निश्चित केलं. आता अधिवेशनाचे उर्वरित दिवस पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात समायोजित करून टाकू, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी दिलेल्या या उत्तरानंतरही विदर्भासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवून द्यावा, अशी विनंती नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. नाना पटोले यांच्या या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा उत्तर दिलं. ते म्हणाले की, मला एक रेकॉर्ड क्लिअर करायचा आहे. नाना पटोले यांचा अधिवेशनासाठी किहीती आग्रह असला तरी नाना पटोले हे अध्यक्ष असताना विधिमंडळाची मुंबईतील अधिवेशनेही ३ आणि ५ दिवसांची झालेली आहेत. बाकी राज्यांत अधिवेशनं चालू होती. तिथे कोरोना नव्हता का? बाकी राज्यांत १५-२० दिवस अधिवेशने चालायची. मात्र महाराष्ट्रात केवळ ३ आणि ४ दिवसंच अधिवेशनं चालायची, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.