'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:51 PM2024-02-27T15:51:43+5:302024-02-27T15:52:23+5:30

'विकास योजनांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही.'

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Uddhav Thackeray's first reaction to the budget | 'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात', अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Interim Budget Session 2024 ) सोमवारपासून (दि.26) सुरू झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज अर्थमंत्री अजित पवार यांनी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. आता या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. 

'शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही'
विधानसभेबाहेर मीडियाशी संवाद साधताना उद्ध ठाकरे म्हणाले की, 'राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. नुकताच राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला, त्याचप्रमाणे संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रारा या अवकाळी घोषणांचा फटका बसेल का, इशी भीती आहे. विकास योजनांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांच्या योजनांची घोषणा झाली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

'हे तर टेंडर सरकार आहे'
'महायुती सरकारच्या दीड-दोन वर्षांचा कारभार पाहिला तर मुंबईत रस्ते घोटाळा झाला, राज्यात अनेक घोटाळे झाले. हे सरकार टेंडरवर टेंडर काढत आहे. आम्ही यांच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला तर दुसरे टेंडर काढले जाते. प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. या महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र जोमात अन् शेतकरी कोमात, अशाप्रकारचा आहे,' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

शिवस्मारकाचे काय झाले?
ते पुढे म्हणाले, 'आज अंगवाडी सेविका, आशा वर्कर संपावर आहेत, त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांविना, ऑषधांविना अनेकांचा मृत्यू होतोय. त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार नवीन रुग्णालयांची घोषणा करत आहे. जुन्या घोषणांचे काय झाले, त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि नवीन घोषणा करण्याचे मृगजाळ आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांबद्दल आम्ही जे धोरण घेतले होते, त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ज्या शिवस्माराकाचे जलपुजन झाले होते, ते पुर्ण करण्याची गॅरंटे कोण घेणार. पुढचे पाठ मागचे सपाट असा अर्थसंकल्प आहे,' अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली. 

मराठा आंदोलकांना अतिरेकी ठरवणार का?
यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलनावरही भाष्य केले. 'मनोज जरांगेंनी आंदोलनाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, महिलांची डोकी फोडली. जणु काय अतिरेकीच घुसले, अशाप्रकारची वागणूक त्यांना दिली गेली. आता जरांगेंनी सरकारवर विविध आरोप केले आहेत. फोन रेकॉर्ड तपासण्याची चर्चा सुरू झाली आहे. आताच्या पोलीस महासंचालिका फोन रेकॉर्डमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडून गृहमंत्री फडणवीसांनी तो सर्व रेकॉर्ड घ्यावा आणि कारवाई करावी. जो आंदोलन करतो, त्यांना अतिरेकी ठरण्यापर्यंत तुमची मजल जाते. एखाद्याची मागणी पूर्ण होत नसेल, तर त्याला विश्वासात घेऊन समजावले पाहिजे. जरांगेंची मागणी सोडून तुम्ही त्यांच्या मागे का लागाला आहात? तुम्ही एसआयटी लावणार असाल, तर चिवटपणाने चौकशी करा,' अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी यावेळी दिली.

Web Title: Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Uddhav Thackeray's first reaction to the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.