मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती आले त्यात आतापर्यंत भाजपा सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे. भाजपाच्या १२५ जागा, शिवसेनेच्या ५५ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३५ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १३ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस २१ जागांवर आघाडी आहे.
ठाकरे गटाच्या १३ जागांमध्ये सिल्लोड, वरळी या मतदारसंघात अत्यल्प मताधिक्य मिळालं असून माहीम, शिवडी मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. जयंत पाटील, रोहित पाटील, राजेंद्र शिंगणे आघाडीवर आहेत. कर्जत जामखेडमधून रोहित पवार पिछाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत. नाना पटोले ४०० मतांनी आघाडीवर आहेत.
इतरांमध्ये जनसुराज्य पक्षाचे गणेश हाके, विनय कोरे आणि हातकणंगलेचे उमेदवार अशोक माने आघाडीवर आहेत. एमआयएमचे औरंगाबाद पूर्वमधून इम्तियाज जलील, सोलापूर मध्यमधून फारूख शाब्दी हे आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वमधून रईस शेख, मानखुर्द शिवाजीनगर भागात अभु आझमी आघाडीवर आहेत. कोल्हापूरात शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर आहेत.
ठाकरे-पवारांची सहानुभूती संपली?
राज्यात शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. राज्यातील २ प्रादेशिक पक्षातील फुटीमुळे ठाकरे-पवारांबाबत सहानुभूतीची लाट निर्माण झाली. या लाटेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. लोकसभेला ३१ खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. त्यानंतर विधानसभेत मविआला चांगले यश मिळेल अशी अपेक्षा होती परंतु विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाल्याचं चित्र समोर आलं आहे.
लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा?
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यात १७ खासदार महायुतीचे तर ३१ खासदार निवडून आले होते. मात्र या निकालानंतर महायुती सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा लागू केल्या. त्यात सर्वात महत्त्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. त्यात महिलांना १५०० रुपये दर महिना दिले जात होते. त्याशिवाय महिलांना एसटीत निम्मे तिकीट, भावांतर योजना या सारख्या योजनांचा फायदा महायुतीला झाल्याचं दिसून येत आहे.