-बाळकृष्ण परब२०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्याच्या राजकारणात उलथापालथीची मालिका सुरू झाली होती. या काळात सत्तांत्तर, फोडाफोडीचे अनेक प्रयोग राज्याने पाहिले. आता यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनमताचा कौल मिळाल्यानंतर या बजबजपुरीतून राज्याची सुटका होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विधानांमुळे २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथींचा दुसरा पार्ट सुरू होणार की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दोन आघाड्या आणि सहा प्रमुख पक्ष, त्याशिवाय अर्धा डझन छोटे किरकोळ पक्ष आणि अपक्ष असा पसारा असल्याने विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच सत्तास्थापनेचा खरा खेळ सुरू होईल आणि नवी समीकरणं उदयास येतील, असे दावे केले जात आहेत. त्यातही महायुतीमधूनअजित पवार आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल. त्यात मागच्या काही दिवसांमध्ये अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे चर्चांना बळ मिळालं आहे. तसेच विधानसभेच्या निकालांनंतर 'किंगमेकर' किंवा 'किंग' बनण्याची संधी आली तर अजित पवार हे काय भूमिका घेऊ शकतात, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवार गटाला महायुतीमध्ये येऊन दीड वर्ष होत आलं तरी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांचे महायुतीसोबत सूर जुळल्याचं फारसं दिसून आलं नाही. त्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून अनेक मुद्द्यांवर दादा गटातील नेत्यांच्या विधानांमधून ही मंडळी महायुतीमध्ये राहण्यास कितपत इच्छुक आहेत, असा प्रश्न पडतोय. त्यातच, नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून अजित पवार गट आणि भाजपा आमने-सामने आले. तसेच देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा तीव्र विरोध डावलून ज्या प्रकारे अजित पवार यांनी त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आणि त्यांच्यासाठी रोड शो केला, त्यामधून अजित पवार गट महायुतीमध्ये यापुढे भाजपाचं फार ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही, असं दिसत आहे. एवढंच नाही तर, योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेलाही अजित पवार यांनी तीव्र विरोध केलाय. त्यामुळे पुढच्या काळात अजित पवार गट आणि भाजपामधील संघर्ष अधिक तीव्रही होऊ शकतो.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात अटीतटीची लढत होण्याचे आणि महायुती व महाविकास आघाडी यांची स्पष्ट बहुमत मिळवताना दमछाक होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामधून अजित पवार यांच्या पुढील भूमिकेबाबत तीन प्रमुख शक्यता समोर येत आहेत. त्यामधील पहिली शक्यता म्हणजे सध्या सत्तेवर असलेली महायुती कशीबशी १४५ जागांपर्यंत पोहोचली, तसेच त्यात अजित पवार यांच्याकडे आमदारांची समाधानकारक संख्या असेल तर अजित पवार हे 'किंगमेकर'च्या भूमिकेत जातील. तसेच सरकारमध्ये मोठा वाटा मागतील. मात्र महायुती सोडणार नाहीत.
दुसरी शक्यता म्हणजे शिंदे गट आणि भाजपाला एकत्रितपणे बहुमताच्या १४५ या आकड्याजवळ पोहोचता आले नाही तर महायुतीमधील अजित पवार यांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच परिस्थितीचा अंदाज घेऊन ते मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तिसरी शक्यता म्हणजे अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या आकड्यामुळे महाविकास आघाडी बहुमताच्या पार जाणार असेल तर राजकीय जुळवाजुळवीसाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार अजित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. या परिस्थितीत अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण करून मुख्यमंत्रिपद देण्याची ऑफर दिली जाऊ शकतो किंवा स्वत: अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. एकूणच विधानसभा निवडणुकीनंतर अनुकूल संख्याबळ मिळालं, तर अजित पवार हे निश्चितपणे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून किंगमेकर किंवा किंग बनण्यासाठी प्रयत्न करतील. आता या सर्व परिस्थितीत अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर नेमका कोणता निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.