Maharashtra Assembly Election 2019 : Only five days left to campaign, Thackeray brothers' meetings in the last phase | Maharashtra Assembly Election 2019 : प्रचाराला उरले केवळ पाचच दिवस, शेवटच्या टप्यात ठाकरे बंधूंच्या सभा

Maharashtra Assembly Election 2019 : प्रचाराला उरले केवळ पाचच दिवस, शेवटच्या टप्यात ठाकरे बंधूंच्या सभा

ठाणे : रविवारच्या सुटीचा फायदा घेऊन सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धडाका उडविल्यानंतर आता सकाळी प्रचार करण्याऐवजी सायंकाळच्या प्रचाररॅली, चौकसभांवर अधिक भर देण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. मतदारयाद्यांतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे कसब पणाला लागले आहे. याशिवाय, पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी तोफ डागल्यानंतर अंतिम टप्प्यात ठाकरे बंधूंची तोफ ठाणे शहरात धडाडणार आहे. उद्धव ठाकरे १७, तर राज ठाकरे हे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १९ ऑक्टोबरला सभा घेणार आहेत. त्यामुळे हे दोघे बंधू एकमेकांविषयी काय बोलतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, याची जाणीव होऊ लागली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी महायुतीचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर, मुंब्य्रात १६ ऑक्टोबरला कन्हैय्या कुमार यांची सभा झाली आहे. आता प्रचाराला अवघे पाचच दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने विविध संस्था, कमिट्या, सोसायट्या, हा समाज तो समाज आदींचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तसेच प्रचाररॅली आणि चौकसभा घेण्यावर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. सकाळच्या सत्रात विविध संस्थांच्या गाठीभेटी, चर्चा आदींवर भर दिला जात असून सायंकाळी ४ वाजल्यानंतरच प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस, तर मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा लढती होत आहेत. त्यामुळे या लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. आपला प्रचार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्याने हजेरी लावावी, अशी प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे. त्यासाठीदेखील फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी हजेरी लावली. त्यामागोमाग नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा ठाण्यात झाली आहे.

* काँग्रेस नेत्यांची ठाण्याकडे पाठ

काँग्रेसचे ठाण्यातील दोन मतदारसंघांत उमेदवार उभे आहेत. त्यांच्याकडून प्रचाररॅली, चौकसभा घेतल्या जात आहेत. आधीच ठाण्यासह जिल्ह्यात काँगे्रसला गळती लागली आहे. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी किंबहुना उभ्या असलेल्या उमेदवारांचा उत्साह वाढविण्यासाठी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी हजेरी लावणे गरजेचे होते. मात्र, पहिल्या टप्प्यासह शेवटच्या टप्प्यातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

* दोन भावांतच बिग फाइट

ठाण्यातील सभा आता जवळजवळ संपल्या आहेत. परंतु, मुख्य सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. यामध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी श्रीनगर भागात सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ते ठाण्यात काय बोलणार हे पाहणे आणि राज ठाकरे यांनी आधीच हीच वेळ आहे... म्हणत शिवसेनेची खिल्ली उडवल्यामुळे त्याचा पलटवार या सभेत होईल, असे बोलले जात आहे. परंतु, त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १९ आॅक्टोबर रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही सभा ठाण्यात होणार आहे. त्यामुळे ते या सभेत पलटवार करतील, असेही बोलले जात आहे. नाही म्हणायला राज यांच्या जिल्ह्यात कल्याण-भिवंडीत सभा झालेल्या आहेत. एकूणच यामुळे खऱ्या अर्थाने दोन भावांमधील बिग फाइट भाषणांच्या निमित्ताने का होईना ठाणेकरांना बघायला मिळणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Only five days left to campaign, Thackeray brothers' meetings in the last phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.