‘अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धड्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा’, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:31 IST2026-03-25T19:30:56+5:302026-03-25T19:31:29+5:30
Maharashtra Assembly budget session 2026: अजित पवार यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आज केली.

‘अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धड्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा’, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी
मुंबई - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा प्रशासकीय दरारा, कामाचा धडाका आणि विकासाची दूरदृष्टी आता पुढच्या पिढीला अभ्यासता यावी, यासाठी त्यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत आज केली.
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी ही मागणी केली. दरम्यान राजकुमार बडोले यांनी अजितदादा पवारांच्या कार्यशैलीचे विविध पैलू मांडत, हा विषय शिक्षण विभागाने गांभीर्याने घ्यावा असे आवाहनही केले. आमदार बडोले यांनी सभागृहात अजितदादा पवारांच्या व्यक्तिमत्त्वातील अशा काही गुणांचा उल्लेख केला ज्यामध्ये दादांची शिस्त आणि वक्तशीरपणा, प्रशासकीय पकड आणि कठोर आर्थिक शिस्त, जनता दरबार, बांधकाम आणि गुणवत्ता, पर्यावरण प्रेम, तंत्रज्ञानाचा स्वीकार याचा समावेश असावा, असे मत त्यांनी मांडले.
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहून अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारीत पाठ्यपुस्तकात धडा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अजितदादांच्या कामात केवळ राजकारण नाही, तर समाजकारण आणि विकासाचा ध्यास होता. सर्वधर्मसमभावाचा विचार आणि जनतेशी असलेली बांधिलकी जपणारा हा नेता विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरू शकतो असे स्पष्ट मत आमदार राजकुमार बडोले यांनी सभागृहात मांडले.