"हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प’’, काँग्रेसची बोचरी टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:33 IST2025-03-10T18:32:08+5:302025-03-10T18:33:03+5:30

Maharashtra Assembly Budget Session 2025: आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर केली आहे.

Maharashtra Assembly Budget Session 2025: "This is a hollow budget that betrays the common man, including farmers and women, and has no direction," said Congress's blunt criticism. | "हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प’’, काँग्रेसची बोचरी टीका   

"हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प’’, काँग्रेसची बोचरी टीका   

मुंबई - आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून, आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की,  राज्याचा हा अर्थसंकल्प फक्त शहरांसाठी बनवलेला आहे का? अर्थमंत्र्यांच्या भाषणात मेट्रो उड्डाणपूल भुयारी मार्ग, विमानतळं, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा यांचाच बोलबाला आहे. पण राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या मूलभूत समस्या सोडवण्याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण किंवा उपाययोजना नाही. आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी बद्दल एक शब्द ही नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सुद्धा पोकळ असून,  आजही शेतकऱ्यांना वसुलीसाठी वीज बिले पाठवली जात आहेत. शेतकरी सन्मान निधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले, पण अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे कृषीक्षेत्रामुळे विकास दर वाढला पण सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतक-यांचा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास करून भाजपा युती सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पहात आहे. समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी झाली हे सर्वांना माहित आहे. त्याच लोकांची समृद्धी पुन्हा व्हावी यासाठी सरकार आपली शक्ती वापरत आहे. सरकारने जाहीर केलेले प्रकल्प, गुंतवणूक ही फक्त मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या भागापुरताच असून राज्याचा मोठा भाग विकासापासून वंचितच आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही नाही.

लाडकी बहीण योजनेतून महिन्याला २१०० रुपये देण्याची घोषणा आज अर्थसंकल्पातून होईल अशी अपेक्षा ठेवून बसलेल्या लाडक्या बहिणींची सरकारमध्ये बसलेल्या कोडग्या भावांनी निराशा केली आहे. जवळपास १० लाख भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. उद्योग धंद्याची वाढ ५.६ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांवर घसरली आहे. सेवा क्षेत्र ही घसरले आहे त्यामुळे रोजगार कमी झाले आहेत. परकीय गुंतवणूक वित्तीय क्षेत्रात आली आहे, औद्योगीक क्षेत्रात नाही ही अत्यंत काळजी वाढवणारी बाब आहे त्याबाबत अर्थसंकल्पात काही ठोस धोरण नाही. 

आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार फक्त मुंबई पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर , कोल्हापूर या जिल्ह्यांची परिस्थिती चांगली आहे पण बाकी जिल्ह्यांची अवस्था दयनीय आहे. या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे. ५० लाख रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ऐकायला चांगले पण हे आकडे फक्त कागदावरच राहणार आहेत. महाराष्ट्रात बेरोजगारांच्ये फौजा आहेत. त्यांच्या हाताला नोकरी रोजगार नाही राज्यातील बेकारीचे चित्र अत्यंत भयावह आहे.  राज्य सरकारची अडीच लाख रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी काहीच धोरण नाही.

अर्थसंकल्पाची सुरुवात करताना अर्थमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन केले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप वीट रचली नाही आणि  हे सरकार आग्र्यात स्मारक उभे करण्यास निघाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली पण याच महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कोरटकर, सोलापूरकर व त्यांच्या पिल्लावळीवर कारवाई केली जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Maharashtra Assembly Budget Session 2025: "This is a hollow budget that betrays the common man, including farmers and women, and has no direction," said Congress's blunt criticism.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.